

सुषमा नेहरकर-शिंदे :
पुणे : खेड तालुक्यातील वांद्रे येथील भीमाशंकर अभयारण्यात जेसीबी लावून अस्तित्वात असलेले मोठे वृक्ष, झुडपांची बेसुमार तोड करून वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे घेण्याचा अजब कारभार वन विभागाने केला आहे. याशिवाय जंगलातील प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पाणवठ्याच्या नावाखाली शेततळ्यासारखे मोठमोठे व मातीचा भराव टाकून उंच तलाव करण्यात आले असून, यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आणि हे पाणवठे प्राण्यांसाठी मृत्यूचे सापळे झालेत. जंगलाचे रक्षण करणार्यांकडून अशी बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याने आता जाब कुणाला विचारायचा? असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.
राज्य शासनाकडून विविध शासकीय विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाकडून घाईघाईत वाटेल तिथे, वाटेल तसे, कुठे गरज आहे हे न पाहता वृक्षारोपण केल्यानंतर झाडे जगतील का? याचा कोणताही विचार न करता जेसीबी लावून वाटेल तसे खड्डे घेण्याचे काम सध्या राज्यभरात सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे जुन्नर वन विभागाच्या खेड तालुक्यातील वांद्रे गावालगतच्या भीमाशंकर जंगलात वृक्षारोपण करण्यासाठी जंगलातील प्राण्यांसाठी विसाव्याची ठिकाणे असलेल्या मोकळ्या जागांमध्ये जेसीबी लावून खड्डे घेण्यात आले आहेत. हे खड्डे घेण्यासाठी अनेक ठिकाणी जंगलामध्ये निसर्गात उगवलेली लहान-मोठी झुडपे, तर अनेक ठिकाणी मोठी झाडे मोठ्या प्रमाणात जेसीबीनेच तोडण्यात आली आहेत.
जाब कोणाला विचारायचा..?
जंगलाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता हे खड्डे घेण्यात आल्याचे येथील स्थानिक लोकांनी सांगितले. जंगलातील एक झाड कापले तरी कारवाई करणार्या वन विभागाकडून स्वतःच जेसीबी लावून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याने आता जाब कुणाला विचारायचा? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.
पाणवठे की मृत्यूचे सापळे..!
भीमाशंकर जंगल परिसरात वन विभागाच्या वतीने प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी जागोजागी पाणवठे करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. या जंगल परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. वन विभागाच्या वतीने या परिसरात नऊ-दहा शेततळ्यांसारखे मातीचा भराव टाकून मोठे खड्डे घेतले आहेत. यामुळे या परिसरात पावसाळ्यात प्रचंड चिखल, दलदल तर होणार आहेच; पण प्राणी पाणी पिण्यासाठी गेल्यास या खड्ड्यांत पडून त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. यामुळेच वन विभागाने प्राण्यांसाठी पाणवठे बांधले आहेत की मृत्यूचे सापळे? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा :