यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट साकारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट साकारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

पुणे, पुढारी ऑनलाईन: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यंदा १३१ व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या गणेशोत्सव काळात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना माणिक चव्हाण म्हणाले की, राम मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवेसुद्धा बसविण्यात येणार आहेत. या प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर असेल. तसेच मंदिराचे छोटे आणि मोठे असे ११ कळस असणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण पुढे म्हणाले की, मुख्य सभागृहात श्री गणपतीचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून समोर सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर आणि मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. तसेच बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू देखील उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणाहूनच भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे मोठे आकर्षण असणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले .

हेही वाचा: 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news