नगर: संगमनेरला पोलीस उपाधीक्षकांनी राबविले कोंबिंग ऑपरेशन | पुढारी

नगर: संगमनेरला पोलीस उपाधीक्षकांनी राबविले कोंबिंग ऑपरेशन

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर उपविभागात येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘ऑल आऊट’ मोहिमेच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी दीडशेहून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. यामध्ये ७ जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळत कारागृहात टाकले. तसेच शहरातील तीन गोवंश कत्तलखान्यांवर छापे टाकत ४३ जनावरांची कत्तल होण्यापासून मुक्तता केली. त्याच बरोबर सार्वजनिक ठिकाणावर गुटखा व सिगारेट विकणाऱ्या ७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शांतता भंग करण्याचा संशय असलेल्या ७१ जणांना आठवडाभरासाठी उपविभागातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव ही सादर करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर यांच्या आदेशान्वये मंगळवारी संगमनेर शहर, तालुका, घारगाव, आश्वी, अकोला व राजूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांनी दिलेल्या आदेशानुसार संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे प्रविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मदतीने आरोपींना समन्स बजावणे, न्यायालयाचे अटक वॉरंट असून ही हाती लागत नसलेल्या आरोपींचा शोध घेणे, अभिलेखावरील गुन्हेगारांची सद्यस्थिती पडताळणे, दारु पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करणे, अवैध दारु, अंमली पदार्थ, जुगार व अन्य अवैध व्यवसायांवर कारवाई करणे यासारख्या गोष्टींचा समावेश होता. या कारवाईत पोलिसांनी अभिलेखावर असलेल्या उपविभागातील १२२ आरोपींना समन्स बजावले आहेत. सोबतच जामिनावर बाहेर असलेल्या १८ आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. फरार असलेल्या ३१ आरोपींच्या घरांची झाडाझडती घेऊन त्यांच्या घरांवर अटक वॉरंटही बजावण्यात आले आहेत.

रस्ता वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्यांच्या विरोधातही पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शंभराहून अधिक वाहनचलकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उपविभागातील सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविण्याची शक्यता असलेल्या 71 जणांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली असून त्या सर्वांना आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यासाठी उपविभागातून हद्दपार करावे, यासाठी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 144 / 2 नुसार त्यांच्या तडीपारीचे प्रस्तावही प्रांताधिकारी तथा दंडाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

संगमनेर शहरातील बेकायदेशीरित्या चालणारा तसेच अनेक वेळा त्या कत्तलखानाच्या मालकावर कारवाया होऊन देखील चालू असणाऱ्या भारत नगरमधील राजीक मुनीर शहा व सुफियान कुरेशी यांच्या कारखान्यावर पो. नि. भगवान मथुरे यांच्या पथकाने छापा टाकत 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 16, तर जमजम कॉलनी परिसरातील राजीक रज्जाक शेख यांच्या कत्तलखान्यातुन 1 लाख 35 हजार रुपये किंमतीची 27 गोवंश वासरे सोडवण्यात आली आहेत. या दोघांवरही महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यासह प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील दोन्ही कत्तलखाण्याचे चालक नेहमी प्रमाणे पसार झाले आहेत.

वाघापूर शिवारातील रायते रस्त्यावरील बाबासाहेब सीताराम पानसरे यांच्या हॉटेल लक्ष्मी येथे छापा टाकत पोलिसांनी 560 रुपयांच्या देशी दारुच्या आठ तर निंबाळे चौफुलीनजीक दीपक ओंकार साळुंके यांच्या ताब्यातून 910 रुपयांच्या 15 देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांवरही मुंबई दारु बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची व सिगारेटची विक्री करणाऱ्या तहसीलजवळील मोईद्दीन जैनुद्दीन शेख (वय 38, रा. मोमीनपुरा), अविनाश नाम देव जगदाळे (वय 36, पेटीट हायस्कूल जवळ) व राजू शिवाजी कोठवळ (वय 40, सिद्धकला महाविद्यालयाजवळ, देवगाव रोड) या तिघांवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा कलम 6 (ब), 24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संगमनेर उपविभागात येणाऱ्या संगमनेर शहर, तालुका, आश्वी घारगा राजुर आणि अकोले या सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसभर व रात्रभर धडक कारवाई करत हे कोम्बिंग ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबविली आहे. ही मोहीम इथेच थांबणार नाही, तर यापुढे देखील वेळोवेळी कोंबिंग ऑपरेशन, ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवून उपविभागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, त्याचप्रमाणे त्यांच्यावरती सक्त प्रतिबंधक कारवाया पोलीस विभागाकडून सातत्याने करण्यात येणार आहे.

श्री सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक, संगमनेर उपविभाग

हेही वाचा:

छत्रपती संभाजीनगर : बैलजोड्यांच्या किमती वाढल्याने शेतात नांगरणीसाठी घोड्यांनाच जुंपले

नगर : जिल्ह्यात 56 हजार क्विंटल बियाणे पडून !

नगर : महसूल कर्मचार्‍यांना बदल्यांची प्रतीक्षा

 

Back to top button