पुणे : खेडशिवापुर टोलनाक्यावर नकली दारूसाठा कंटेनर पकडला | पुढारी

पुणे : खेडशिवापुर टोलनाक्यावर नकली दारूसाठा कंटेनर पकडला

पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गावरील कार्यक्षेत्रामध्ये मद्यसाठा प्रकरणी गुन्हे उघडकीस येत आहेत. मंगळवारी (दि. २०) रात्री आठच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्या वतीने खेड शिवापुर टोल नाक्यावर सापळा रचून बनावट दारू घेऊन निघालेला ट्रक पकडून कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये बनावट दारू ही महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असते, या प्रकारची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे होती. त्या पार्श्वभमीवर कंटेनर (NL 01 AA 7112) हा गोव्यावरून बनावट दारू घेऊन मुंबईच्या दिशेने चालला आहे, अशा प्रकारची माहिती संबंधित विभागाला मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संबंधित कंटेनरचा पाठलाग केला जात होता. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा कंटेनर खेड शिवापुर टोल नाका पास करून पुढे आला असता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रक तपासासाठी अडवला. त्यामध्ये विविध कंपन्यांची लेबल असलेल्या दारूच्या बाटल्याची पोती व बॉक्समध्ये भरलेली आढळून आल्या. या मुद्देमालाची किंमत सुमारे ८५ लाख रुपये असल्याची माहिती संबंधित विभागाच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सहभाग घेतला.

शंभूराजे देसाई पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये बनावट दारू विक्री हा अक्षम्य गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये खूप मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्याचा उलगडा लवकरच होईल. ही कारवाई केल्याबद्दल कारवाईमध्ये सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केलेे असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा कसा करता येईल याबद्दल लवकरच विभागाच्या वतीने बैठक घेतली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.

या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय उपायुक्त मोहन वर्द्रे, यांच्या मार्गदरशनाखाली पोलीस अधीक्षक सी. पी. राजपूत, निरीक्षक प्रवीण शेलार, दीपक सुपे, उपनिरीक्षक प्रदीप मोहिते एस. के काणेकर, विजय चौधरी, राम सुपे, अक्षय मेहेत्रे, भागवत राठोड, संदीप सुर्वे, सुनील कुदळे, तात्या शिंदे, दत्ता पोलावरे, रणजित चव्हाण, समीर पडवळ, संदीप मांडवेकर, रामेश्वर चावरे यांनी सहभाग घेतला होता.

हे ही वाचा :

राज्य सरकारच्या दोन निर्णयांमुळे एसटीला अच्छे दिन; मे महिन्यात तब्बल ९१३ कोटीचे उत्पन्न

अन्नातही राजकारण, राज्यभर आंदोलन; भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन; भाजपही रस्त्यावर

 

Back to top button