अन्नातही राजकारण, राज्यभर आंदोलन; भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन; भाजपही रस्त्यावर | पुढारी

अन्नातही राजकारण, राज्यभर आंदोलन; भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन; भाजपही रस्त्यावर

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात तांदूळ पुरवठ्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. प्रतिमाणसी 10 किलो तांदूळ पुरवठा करण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. मात्र त्यासाठी लागणारा तांदूळ देण्यास केंद्र सरकारने नकार दर्शविल्याने मंगळवारी केंद्र सरकारच्या विरोधात राज्यभरात काँग्र्रेसने आंदोलन केले. तर 10 किलो तांदळाची हमी देऊनही एकही किलो तांदूळ न दिल्याने भाजपनेही राज्यभरात आंदोलन छेडले.

गोरगरिबांच्या अन्नाबाबतही राजकारण करणार्‍या भाजपला आगामी लोकसभा, जिल्हा व तालुका पंचायत आणि महानगर पालिका निवडणुकांमध्ये जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी केले. बंगळूरमधील फ्रीडम पार्कवर राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होऊन उपमुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, अन्नदान हेच श्रेष्ठ दान याव्यतरिक्त दुसरे कोणतेच पुण्य नाही. राज्य भूकमुक्त करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठीच अन्नभाग्य योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला 10 किलो तांदूळ पुरवठा करण्यासाठी आपल्या सरकारने पुढाकार घेतला आहे. मात्र केंद्र सरकारने अडथळा आणला आहे.

केंद्राने नकार दर्शविल्याने इतर राज्याकडून तांदूळ खरेदी करण्यासाठी सरकारने योजना आखली आहे. देशातल्या शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार अशी पोकळ आश्वासने भाजपने दिली आहेत. शेतकर्‍यांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा कधी होणार, असा प्रश्न यावेळी शिवकुमार यांनी उपस्थित केला. काँग्रसचे सचिव अभिषेक दत्त, केपीसीसी कार्याध्यक्ष सलीम अहमद, माजी मंत्री राणी सतीश आदी उपस्थित होते.

भाजपचेही आंदोलन

एकीकडे काँग्रेसचे आंदोलन सुरु असताना भाजपनेही काही जिल्ह्यात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. बंगळूर, तुमकुर, शिमोगा, दावणगिरी, उडपी, गुलबर्गा, मंगळूर, चिक्कमगळूर, बळ्ळारी, विजयनगर या जिल्ह्यात आंदोलन केले. बंगळूरमदील आनंद राव चौकात भाजपच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मंत्री आर.अशोक सहभागी झाले होते.

बोम्मई म्हणाले की, काँग्रेसने 10 किलो तांदूळ पुरवठा करण्याची हमी दिली होती. मात्र आतापर्यंत 1 किलोही तांदूळ पुरवठा केलेला नाही. सध्या मिळणारे 5 किलो तांदूळ केंद्राकडून मोफत दिले जात आहेत. पाचही योजना खोट्या असून सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 1 जुलैपासून अन्नभाग्य योजना न राबवल्यास राज्यव्यापी आंदोलन करु.

Back to top button