पुणे : अरुण चांभारे यांचे कात्रज डेअरीचे संचालकपद रद्द | पुढारी

पुणे : अरुण चांभारे यांचे कात्रज डेअरीचे संचालकपद रद्द

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) संचालक अरुण सीताराम चांभारे (ता. खेड) यांचे संचालकपद रद्द करून त्यांना पदावरून कमी करण्याचा आदेश विभागीय सहकार उपनिबंधक (दुग्ध) डॉ. महेश कदम यांनी दिला आहे.
चांभारे यांचे सख्खे पुतणे संदीप ज्ञानदेव चांभारे यांच्याकडे कात्रज डेअरीच्या उपपदार्थ विक्रीच्या वितरण एजन्सीकडून 42 लाख रुपयांहून अधिक रक्कम वसूल होणे बाकी असल्याने अरुण चांभारे यांनी संचालक म्हणून कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत आणि संघाच्या व तिच्या सदस्यांच्या हितास बाधक होईल अशी कृती केल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथील राजेंद्र लक्ष्मण म्हसे यांनी याबाबत निबंधकांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. अरुण चांभारे हे सन 2010-2015 या कालावधीत संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा संदीप चांभारे यांच्या नावे संघाच्या उपपदार्थ विक्रीचा ठेका देण्यात आला. या सभेस अरुण चांभारे उपस्थित होते. संबंधित एजन्सीकडून जुलै 2017 अखेर 42 लाख 5 हजार 420 रुपये व त्यावरील आजपर्यंतचे व्याजासह 80 लाख रुपयांइतकी रक्कम येणे आहे.

कात्रज दूध संघाकडून यासंबंधी अहवाल मागविला असता संघाने राधाकृष्ण मिल्क एजन्सी, प्रोप्रा. संदीप ज्ञानदेव चांभारे यांना कात्रज दूध व दुग्धजन्य पदार्थ वितरण एजन्सी दिली होती व त्यांच्याकडून खरेदी पोटी दिलेले 11 चेक न वटल्याने जुलै 2017 मध्ये 42 लाख 5 हजार 420 रुपयांच्या वसुलीसाठी 11 फौजदारी दावे सहकार न्यायालयात दाखल केले आहेत. तसेच दाखल दाव्यात तत्कालीन संचालक अरुण चांभारे यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने त्यांना पार्टी करून घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने 29 जानेवारी 2021 च्या ठरावात घेतला असल्याचा अहवाल दिला.

चांभारे हे कात्रज दूध संघावर सन 2021-22 ते 2026-27 या कालावधासाठी संचालक मंडळावर पुन्हा निवडून आले आहेत. तसेच संघावर संचालक म्हणून राहण्यास अपात्र असल्याची तक्रार म्हसे यांनी दुग्ध उपनिबंधकांकडे 28 सप्टेंबर 2022 रोजी केली होती. विशेष म्हणजे राधाकृष्ण एजन्सीला ठेका देणे हा अरुण चांभारे यांचा निर्णय नसून, तो तत्कालीन संचालक मंडळाने घेतलेला निर्णय आहे. संबंधित दाव्यात त्यांना पार्टी केलेले नसल्याने त्यांचे नांव संबंधित ठरावातून वगळण्यात यावे, असा निर्णय सध्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 25 ऑगस्ट 2022 च्या ठरावानुसार घेण्यात आला.

त्यावर उपनिबंधकांकडे सुनावणी होऊन म्हणणे ऐकून घेण्यात आले. संदीप चांभारे हे भोसरी येथे स्वतंत्र राहत असल्याचा दावा करण्यात आला. परंतु गावाकडील मतदान पुरावा व एकत्र कुटुंब म्हणून आवश्यक पुरावे तक्रारदाराने दिले. या सर्वांचे संदर्भ लक्षात घेऊन चांभारे यांचा थेट हस्तक्षेप याप्रकरणी दिसून आला. त्यामुळे अरुण चांभारे यांना दोषी ठरवून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ (1)(ब) अन्वये दुग्ध उपनिबंधक डॉ. कदम यांनी संचालक म्हणून पदावरून कमी करण्याचे आदेश 16 जून रोजी जारी केले आहेत.

कात्रज दूध संघाच्या संचालक पदावरून मला कमी करण्याचा विभागीय दुग्ध उपनिबंधकांनी दिलेला आदेश हा माझ्यावर अन्यायकारक आहे. या निर्णयास मी उच्च न्यायालयात दाद मागत आहे. मला त्याठिकाणी निश्चितपणे न्याय मिळेल.

अरुण चांभारे,
खेड.

हेही वाचा

Moonson : जूनच्या सरासरीत महाराष्ट्रात यंदा नीचांकी पाऊस; पेरण्या खोळंबल्या

पुणे : ना फायर ऑडिट, ना इन्शुरन्स ! दै. पुढारी’ने गोदामांबाबत केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर

पुणे : तीन कनिष्ठ अभियंते पालिका सेवेतून बडतर्फ

Back to top button