

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : दारू पिऊन धिंगाणा घालणार्या वकिलाने आळेफाटा पोलिस ठाण्यात धिंगाणा घालत शिवीगाळ करून एका पोलिस शिपायाच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी 33 वर्षांच्या वकिलाविरुद्ध आळेफाटा पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 जून रोजी रात्री पावणेबारा वाजता घडली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल भुजंग नारायण सुकाळे यांनी फिर्याद दिली आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील एका दारूच्या दुकानासमोर एकजण दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, हवालदार विकास गोसावी, लहानू बांगर यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली.
त्यांना तेथे फाटलेले कपडे असलेला एक इसम दारू पिऊन आरडाओरडा करताना दिसला. निरीक्षक नलावडे यांनी त्याची चौकशी केली असता त्याने वकील असल्याचे सांगत हुज्जत घातली. त्यामुळे त्यास पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याने त्याचे नाव, पत्ता सांगितला.
पोलिसांनी त्याच्या घरी याबाबत कळविले. त्यानंतर त्याचा चुलतभाऊ व इतर नातेवाईक पोलिस ठाण्यात आले. त्यांना वकिलाने पोलिसांना शिवीगाळ करत तुमच्या नोकर्या घालवतो, अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने कॉन्स्टेबल भुजंग सुकाळे यांची कॉलर पकडत कानशिलात लगावली. हवालदार विकास गोसावी व लहानू बांगर यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने दोघांनाही लाथा मारून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहेत.
हे ही वाचा :