अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जानेवारीत ; स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची घोषणा | पुढारी

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जानेवारीत ; स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची घोषणा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असून, येत्या जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची असल्याची घोषणा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात केली.

अयोध्येतील राममंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून सर्वसामान्यांना श्रीरामांचे दर्शन घेता येणार असून, देशभरातून विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
निवडक साधुसंत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश नसेल, परंतु, प्राणप्रतिष्ठेच्या दुसर्‍या दिवसापासून सर्वसामान्यांना श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सर्वांनी अयोध्येला यावे आणि दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘नवीन शिक्षण पद्धती आवश्यक’

‘भारताचे तुकडे करणार्‍या घोषणा आता उघडपणे दिल्या जात असल्या, तरी त्या इंग्रजांच्या योजनेचेच फलित आहेत. या योजना मोडून काढण्यासाठी नवीन शिक्षण पद्धती आवश्यक आहे,’ असे मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी रविवारी व्यक्त केले. सज्जनगड येथील श्रीरामदासस्वामी संस्थानतर्फे देण्यात येणारा ‘श्री समर्थ रामदासस्वामी’ पुरस्कार गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते पुण्यातील श्री समर्थ व्यासपीठ संस्थेला प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब स्वामी, श्री समर्थ व्यासपीठाच्या अध्यक्षा माधवी महाजन, कार्याध्यक्षा स्वाती वाळिंबे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण, कौशल्य विकास, देशाच्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान जाागृत करणे यासोबत मूल्यशिक्षणावर भर देण्यात आला आहे. आतापर्यंत शालेय अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण शून्यवत होते. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणानुसार, मूल्यशिक्षण सक्तीचे केले जाणार आहे.’ रोहित जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

हे ही वाचा : 

पुणे : मुलगा राहिला महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्येच ! रेल्वे अधिकार्‍यांच्या सतर्कतेने झाली कुटुंबीयांशी भेट

महत्त्वाची बातमी ! तलाठी भरतीत राज्यासाठी एकच प्रश्नप्रत्रिका ; साडेचार हजार पदांसाठी होणार परीक्षा

 

Back to top button