पुण्यातील शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य आढळले मृतावस्थेत | पुढारी

पुण्यातील शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य आढळले मृतावस्थेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम परिसरातील एका सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे आढळून आले. हेमंत रामकृष्ण थोरात (वय 64) पत्नी सुनीता (वय 58, दोघे रा. सेवा मित्र मंडळाजवळ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) अशी मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. थोरात हे बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून, दोघेही अमेरिकेत आहेत. येथे दोघे पती-पत्नीच राहात होते. पत्नी सुनीता या गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मानसोपचार सुरू होते.

थोरात दाम्पत्याचा घराचा दरवाजा सकाळी बंद होता. दरवाजा उघडा नसल्याने शेजार्‍यांना संशय आला. शेजार्‍यांनी दरवाजा वाजविला. मात्र, थोरात यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती खडक पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सुनीता कॉटवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. हेमंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

नातेवाइकांची पोलिसांकडून चौकशी
सुनीता आणि हेमंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुनीता यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. खडक पोलिसांकडून थोरात यांच्या नातेवाइकांची चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच सुनीता यांच्या मृत्यूचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. पुण्यात त्यांचे भाचे, पुतणे व इतर नातेवाईक आहेत. त्यांना याची माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

Nepal Flood | नेपाळमध्ये पूर, भूस्खलनामुळे हाहाकार, ५ मृत्यू, २८ बेपत्ता

पुणे : वारजे कॅनाॅल रस्त्यावर 5 गाड्यांच्या काचा फोडल्या

Back to top button