पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे सिनिअर आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील आहेत तसेच माजी खासदार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत. एखाद्या व्यक्तीने त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये संविधानाने तो त्यांना दिलेला आहे. परंतु कोणी अशी कृती केली तर ती शिवप्रेमींना आवडत नाही. इतिहासात औरंगजेबाने त्या पद्धतीने त्रास दिला, काही घटना घडल्या, त्यामुळे लोकांना ते योग्य वाटत नाही. परंतु उद्या तुम्ही पत्रकार म्बणून तेथे जावून पाहणी केली तर आम्ही विरोध करू शकत नाही. याबाबत जास्त अधिकारवाणीने आंबेडकर हेच सांगू शकतील की ते तेथे कशासाठी गेले होते, त्यांच्या मनामध्ये काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. पण शनिवारी मी संभाजीनगर परिसरात होतो. तेथे या प्रकाराची दबक्या आवाजात कुजबूज सुरु होती, सोशल मिडियावर चर्चा होती. एक गोष्ट खरी आहे की या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज झाले.