

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे. राज्य सरकारला यासंबंधीचे अधिकार असतात. होळकर यांचे इतिहासातील योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचे नाव दिल्याच्या निर्णयाचे स्वागतच असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मेडिकल कॉलेजला दिल्यानंतर बारामतीच्या लोकप्रतिनिधींनी त्याचे स्वागत केले नसल्याची टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती. रविवारी बारामतीत पवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली.
पवार म्हणाले, शासकीय मालकीच्या बाबींना नावे देण्याचा पूर्ण अधिकार राज्य सरकारला असतो. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी हा निर्णय घेण्यात आला. चौंडी येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव देत असल्याचे जाहीर केले.
काहीजणांनी अहिल्यानगर तर काहींनी अहिल्यादेवी नगर असे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिवबाबत राज्य सरकारने जीआर काढला होता. परंतु उच्च न्यायालयाने पूर्वीचेच नाव सध्या वापरावे, असे प्रशासनाला सांगितले आहे. अहमदनगरबाबत अद्याप जीआर निघालेला नाही.
महान व्यक्तींची नावे दिल्यानंतर समाज, लोकप्रतिनिधी त्यांचे स्वागत करत असतात. बारामतीच्या मेडिकल कॉलेजचा पाया भरण्यापासून ते आजवरच्या सगळ्या कामाचा मी साक्षीदार आहे. अनेकदा निधी मिळविण्यासाठी मी काय काय केले हे माझे मलाच माहित आहे.
परंतु, ते माझे कर्तव्य होते. बारामतीचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती जबाबदारी होती. त्या भावनेतून ते काम झाले. आता तिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज बारामती असे नामकरण झाले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी ती घोषणा केली आहे. अहिल्यादेवी होळकर हे एक महान नाव आहे. राज्य कारभार कसा करावा हे त्यांनी दाखवून दिले आहे.
त्यांचे नाव द्यावेच परंतु त्यात बारामतीचा उल्लेख असावा अशी विनंती लोकांनी मला केली आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज बारामती किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी बारामती मेडिकल कॉलेज असे त्यात होवू शकते. शेवटी मी यात काही करू शकत नाही. तो अधिकार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा नाही, तो अधिकार राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्या खात्याच्या मंत्र्यांचा असतो. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला, त्याचे मनापासून स्वागत आहे असे पवार म्हणाले.
बारामतीत दि. २५ जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सभेसंबंधी मी अधिकारी-पदाधिकाऱयांशी चर्चा केली आहे. त्यांचे आदरातिथ्य करणे, स्वागत करणे हे बारामतीकर या नात्याने माझी जबाबदारी आहे, बारामतीकरांचीही जबाबदारी आहे, ती योग्यरित्या पार पाडू, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
हेही वाचा;