पुणे : ‘खाकी’मुळं मिळालं सौभाग्याचं लेणं ! | पुढारी

पुणे : ‘खाकी’मुळं मिळालं सौभाग्याचं लेणं !

पुणे : पुढारी वृत्तसेवा ‘पोटाला चिमटे काढून थोडे-थोडे पैसे जमा केले. त्यातून तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र तयार केले. आठ-दहा दिवसांतच चोरट्याने ते हिसकावले. परत मिळेल, असे वाटले नव्हते. पण दादा, तुमच्यामुळे ते परत मिळाले. तुमच्यासारखे बांधव असल्यामुळे पोलिसांवर विश्वास वाटतो…’ चोरीला गेलेले मंगळसूत्र दीड महिन्यानंतर मिळाल्याचे पाहून जयश्री मानमोडे यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. पाषाण येथील मानमोडे अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. पती, मुले आणि त्या असा त्यांचा परिवार. जेमतेम हातावरचेच पोट. थोडे-थोडे पैसे साठवून त्यांनी तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र तयार केले. आठ दिवस ते घातलेही.

एकेदिवशी कामावरून परत जात असताना, दुचाकीस्वार चोरट्याने ते हिसकावले. दिवसभर धाय मोकलून त्या रडत होत्या. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळसूत्र परत मिळण्याची त्यांनी आशा सोडून दिली होती. मात्र चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडीक, रूपशे चाळके, कर्मचारी हवालदार बाबूलाल तांदळे, आशिष निमशे, किशोर दुसिंग, बाबा दांगडे यांच्या पथकाने शंभर सीसीटीव्ही कॅमेर्यातील फुटेज तपासून चोरट्याचा माग काढला. कोथरूड परिसरातून त्याला अटक केली. त्याच्याकडून हिसकावलेले मंगळसूत्र जप्त केले. त्यानंतर न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण करून मानमोडे यांना मंगळसूत्र परत केले. मंगळसूत्र मिळाल्याचे पाहून जयश्री यांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

हे ही वाचा : 

सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकणारे तुम्हीच खरे गद्दार : श्रीकांत शिंदे

शेवगाव तालुका : बिनशेती आदेश प्रकरण; दोषींवर गुन्हे दाखल करा

Back to top button