पुणे: वारजेतील रामनगर परिसरात भरदिवसा गोळीबार, आरोपींनी तरूणाच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या | पुढारी

पुणे: वारजेतील रामनगर परिसरात भरदिवसा गोळीबार, आरोपींनी तरूणाच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या

पुणे /वारजे, पुढारी वृत्तसेवा: वारजेतील रामनगर वसाहत परिसरात भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात तरूणाच्या हाताला गोळी घासून गेली असून या घटनेत सुरज लंगर (वय वर्षे 23 रा. रामनगर पाण्याची टाकी चौक) हा तरुण जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवार 17 जुन रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान पाण्याची टाकी चौक परीसरात घराजवळ मित्रासोबत बसलेल्या सुरज लंगर या तरूणाच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञातांकडून जवळपास पाच गोळ्या झाडल्या. यामधील एक गोळी सुरजच्या हाताला घासुन गेली असल्याची माहिती असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोळीबार करून आरोपींनी पळ काढला. आरोपींमधील एकाचा मोबाईल रस्त्यावर सापडला असून पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.

गतवर्षी 16 डिसेंबर 2022 रोजी वारजे येथील रामनगरमधील वेताळबुवा चौकात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज रामनगर परीसरात पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर रस्त्यात गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जातेच कशी? असा सवाल देखील आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा:

जनतेला महागाई, बेरोजगारीची चिंता, राज्यातील नौटंकीचं देणंघेणं नाही : अजित पवार

अजित पवारांनी युतीत यावे : दीपक केसरकर

पिंपरी : अजित पवारांच्या विश्वासू आमदाराची मुख्यमंत्र्यांकडून भेट

 

Back to top button