

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला धावती भेट दिली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी (दि. 16) शहराच्या दौर्यावर असताना त्यांनी ही भेट दिली.
या वेळी राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे माजी नगरसेवक अमित गावडे, भाजपचे शैलेश मोरे, राष्ट्रवादीच्या माजी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'शासन आपल्या दारी', या कार्यक्रमासाठी शहरात आले होते. त्यांनी सायंकाळी पिंपरी मतदारसंघाचे आमदार बनसोडे यांच्या चिंचवड येथील कार्यालयास भेट दिली. तब्बल अर्धा तास मुख्यमंत्री आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात बसून होते. त्या वेळी काही निवडक मंडळींनाच आतमध्ये प्रवेश दिला.
गेल्या काही दिवसांपासून आमदार बनसोडे आपल्या नेत्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि आमदार बनसोडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे माध्यमांनी टिपले होते. त्या वेळीदेखील बनसोडे हे शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री शिंदे यांना भेटीबाबत विचारले असता, त्यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. तसेच, अण्णा हे माझ्या जवळचे असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. एकंदरीतच अण्णा बनसोडे आणि मुख्यमंत्र्यांची झालेली भेट नवीन राजकीय बदलाची नांदी ठरू शकते, असे बोलले जात आहे.
पिंपरी मतदारसंघाच्या समस्या घेऊन मी अनेकदा मुख्यमंत्री कार्यालयात जातो. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामाणिकपणे सर्वांची कामे करीत असल्याचे पहावयास मिळते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
हेही वाचा