जनतेला महागाई, बेरोजगारीची चिंता, राज्यातील नौटंकीचं देणंघेणं नाही : अजित पवार | पुढारी

जनतेला महागाई, बेरोजगारीची चिंता, राज्यातील नौटंकीचं देणंघेणं नाही : अजित पवार

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या नौटंकीचे जनतेला काहीही देणं घेणं नाही. जनतेला महागाई कमी व्हावी, बेरोजगारी हटावी, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे असे वाटते. राज्यात पाऊस नाही, कोकणासारख्या भागामध्ये आताही टँकर सुरु आहेत, धरणातील पाणी कमी होत आहे त्यामुळे सरकारने आता एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा राज्यकारभाराकडे लक्ष द्यावे, असा सल्ला विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला.

शनिवारी (दि.१७) छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय सेलच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीरासाठी पवार हे शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी सरकारकडून करण्यात आलेल्या जाहीरातबाजीवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, कोट्यावधी रुपयांच्या जाहीरातीतील पहिल्या पानावर देता, त्यामध्ये ज्यांची नावे घेऊन सत्तेवर आले असे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचाच फोटो जाहीरातीत नाही. मग काही जण म्हटले की ते आमच्या हृदयात आहेत, जर ते हृदयात होते तर दुसऱ्या दिवशी पेपरमधील जाहीरातीत कसे आले? प्रश्न विचारायचा आम्हाला अधिकार आहे. तुम्हीच प्रश्न निर्माण करता, तुम्हीच चुका करता व तुम्हीच त्यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न करता, ही जी नौटंकी सुरु आहे त्याचे जनतेला काहीही देणंघेणं नाही. जनतेचे महागाई कमी कशी होईल, बेरोजगारी कशी हटेल याकडे लक्ष आहे.

धरणातील पाणी कमी होत चालले आहे, चिपळूनमध्ये टँकर सुरु आहेत. काही दिवसांपासून राज्यात सारख्या महिलांवरील अत्याचार, जातीय दंगलीचे, समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढत असल्याचे सांगत अशा प्रकारच्या घटनांकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेकडे लक्ष देण्याची गरज आहे, एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा राज्यकारभाराकडे लक्ष द्यावे, राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेली नाही. फेविकॉलचा मजबुत जोड आहे असे म्हणतात मात्र खालील कार्यकर्तेत संभ्रमावस्थात असल्याचेही पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेवेळी आमदार राजेश टोपे, सतीश चव्हाण तसेच कैलास पाटील, सुरजितसिंग खुंगर यांची उपस्थिती होती.

५० खोके, १०५ डोके म्हणजे भाजपने शिंदे गटाला डिवचले

सभागृहाच्या बाहेर ज्यावेळी पन्नास खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जायच्या त्यावेळी शिंदे गटाला प्रचंड राग येत असे, पण पन्नास खोके, एकदम ओके ही घोषणात आता तळागाळापर्यंत पोचली आहे, नांदेड येथे भाजपने लावलेल्या एका पोस्टरवर ५० खोके आणि १०५ डोके असे म्हटले आहे. आता ५० खोके आणि १०५ डोके हे भाजपवाल्यांनीच सांगितले आहे त्या सोबतच देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं म्हणत भाजपने शिवसेना शिंदे गटाला डिवचले आहे, भाजपवालेच असे म्हणत असतील तर जनतेने केलेल्या ५० खोक्यांच्या आरोपाला एकप्रकारचा दुजोराच मिळाला असल्याचे मत असल्याचे पवार यांनी सांगितले.

आमच्याकडे बैलाच्या जोड्या असायच्या

सध्या फेविकॉल का जोड, जय विरुची जोडी हे सांगायची वेळ तुमच्यावर का यावी ? असा सवाल करत पवार म्हणाले की, आम्ही शेतकरी माणसं आहोत.. आमच्याकडेही बैलाच्या जोड्या असायच्या. त्यावेस राजा- सर्जा अशा प्रकारचे नावे असायची असे पवार यांनी सांगितले.
टाकण्यात येत असलेल्या धाडी हा संशोधनाचा भाग

राज्यातील पाच ते सहा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची सातत्याने प्रकरणे समोर येत आहेत, आम्ही वारंवार या संदर्भात भुमिका मांडली आहे, सरकार म्हणून मत व्यक्त केलं पाहिजे मात्र ते होत नाही. अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात येतात मात्र त्या धाडी कायदेशिर आहेत की बेकायदेशीर हा संशोधनाचा भाग आहे. काही ठिकाणी धाड टाकण्याचा अधिकार नव्हता अशा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.

 तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार

राज्यात पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था योग्य पद्धतीने राखण्यामध्ये कमी पडत आहेत, हे रोज वेगवेगळ्या प्रकरणातून समोर येत आहे. जे घडतंय ते थांबायला तयार नाही, कायदा सुव्यवस्था चांगली राहण्या करीता जर गृह मंत्रालयाचे प्रमुख कमी पडत असतील तर लोकशाही मध्ये त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नागरीकांना आहे.

तो करिश्मा मोदींचा, भाजपचा नाही

मोदींचा करीश्मा याबद्दल केलेल्या विधानावर बोलताना पवार म्हणाले की, भारतात स्वातंत्र्य मिळाल्यापासून काही नेतृत्वांनी पंडीत नेहरु, लालबहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधींचा करिश्मा लोकांनी पाहिला, त्यानंतरच्या काळात २०१४ ला भाजप पक्ष म्हणून सत्तेत आला नाही तर नरेंद्र मोदींचा करीश्मा भारतामध्ये चालला, ज्या भागामध्ये कधी भाजप निवडून आला नाही तेथे भाजप निवडून आला हे खोटं आहे का ? यामध्ये माझं काय चुकलं ? असे पवार म्हणाले.

लोकसभेच्या २५ जागांवर चर्चा

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि महाविकास आघाडी याबद्दल पवार म्हणाले की, राज्यातील २५ जागांवर पहिल्यांदा चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर २३ जागांच्या बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व पक्षाचे प्रमुख मुंबईमध्ये आल्यानंतर आम्ही त्याबद्दल निर्णय घेऊ, आपापल्या मित्रपक्षांनी त्या त्या पक्षाने सामावून घ्यावे असे मला वाटते असेही पवार यांनी सांगितले.

Back to top button