

फुरसुंगी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: कालव्यामधून जाणारी जलवाहिनी तुटल्यामुळे फुरसुंगीतील रिव्हर पार्क, सरपंच वस्ती, निर्मळ वस्ती तामखडा, सायकरवाडी आणि पांडवदंड परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या २० दिवसांपासून या भागातील पाणीपुरवठा बंद असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
गांधनखेळा येथील नवीन कालव्याजवळील विहिरीमधून लोखंडी पाईपलाईनमधून रिव्हर पार्क, सरपंच वस्ती, निर्मळ वस्ती तामखडा, सायकरवाडी आणि संपूर्ण पांडवदंड या भागाला पाणीपुरवठा होतो. मात्र, गेल्या २० दिवसांपासून या भागात पाणीच आले नाही. सुरुवातीला विद्युत पंप जळाल्यामुळे आणि नंतर नवीन कालव्यातील लोखंडी जलवाहिनीचा जोड तुटल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवून देखील दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते विशाल हरपळे यांनी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी स्वखर्चाने कालव्यावर तात्पुरती १०० फुटांची पाईपलाईन टाकली आहे. याप्रसंगी स्थानिक रहिवासी अंकुश पारगे, बाजीराव सायकर, धनंजय कामठे, शरद पवार, बापू म्हस्के, काका झांजे, भाऊसाहेब जगताप, नंदू चौधरी, भाऊ पवार, पिंटू सरोदे आदी उपस्थित होते
जलवाहिनी तुटल्यामुळे गेल्या २० दिवसांपासून या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. महापालिका प्रशासन कर गोळा करण्यासाठी तत्पर आहे. मात्र, जलवाहिनीच्या दुरूस्तीबाबत अधिकाऱ्यांची चालढकल सुरू आहे.
-विशाल हरपळे, सामाजिक कार्यकर्ते, फुरसुंगी
हेही वाचा: