पुणे : पुढारी वृत्तसेवा : नोकरीसाठी पुण्यात आलेल्या पश्चिम बंगालच्या तरुणीवर तिच्याच ऑफिसमधील मालकाने अश्लील व्हिडीओ दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिने आरडा-ओरडा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, एकाने तिला बंदुकीचा धाक दाखवून दुबई येथे विक्री करण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार कॅम्प परिसरातील अँटोमिक ट्रेड पॅलेस, अरोरा टॉवर, वेस्ट एन्ड येथे घडला. याप्रकरणी, लष्कर पोलिसांनी महेश्वर रेड्डी (वय 50, रा. कोंढवा), चिरागउद्दीन शेख (वय 35, रा. कोंढवा), एक 35 वर्षीय महिला आणि अर्जुन ठाकरे (वय 58) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 28 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना 25 मे ते 4 जून 2023 या कालावधीत घडली.
फिर्यादी तरुणी मूळची पश्चिम बंगाल येथील असून, उच्चशिक्षित आहे. नोकरीच्या निमित्ताने ती पुण्यात आली आहे. नोकरीविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून तिचा परिचय ठाकरे याच्यासोबत झाला होता. ठाकरे याने रेड्डी याच्याकडे नोकरीसाठी तरुणीला पाठवले होते. रेड्डी याने तरुणीची मुलाखत घेतल्यानंतर तिला नोकरीसाठी ठेवले. पर्सनल सेक्रेटरी म्हणून तरुणी रेड्डीकडे नोकरी करत होती. त्याचवेळी विविध बहाण्याने त्याने तरुणीसोबत अश्लील वर्तन करत लगट करण्याचा प्रयत्न केला. 3 जून रोजी रेड्डी याने परत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी तिने घाबरून बाहेर पळ काढला. ऑफिसमध्ये असलेल्या आरोपी महिलेने तिला याबाबत विचारले असता, तिने झालेला प्रकार महिलेच्या कानावर घातला. त्या वेळी त्या महिलेने तिचा पती चिरागउद्दीन शेख याला बोलावून घेतले. त्याने तेथे येऊन बंदुकीचा धाक दाखवत तरुणीला दुबई येथे विक्री करण्याबरोबरच तिच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. सतत होणार्या अत्याचारामुळे तरुणीने धाडस करून ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.
नोकरीच्या निमित्ताने ही तरुणी पुण्यात आली होती. त्या वेळी तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी एका महिलेसह चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
– राजेश तटकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे
हे ही वाचा :