

इंदापूर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मालोजीराजे गढीवरील शेकडो वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड पाडताना नगरपरिषदेने योग्य ती खबरदारी न घेतल्याने देशी-विदेशी पक्ष्यांची मोठी वसाहत (सारंगागार) नष्ट झाली. यात चित्रबलाकांसह शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला. या झाडावर गेली अनेक वर्षे चित्रबलाक या पक्ष्यांचे गोकुळ फुलत होते. ते काही क्षणात नष्ट झाले. शेकडो घरटी उद्ध्वस्त झाली. चित्रबलाक, वटवाघूळ, खारुट्या, सरडेदेखील जागीच मरण पावले. दरम्यान, वृक्षतोड झाल्याचे समजताच दौंड येथील रेस्क्यू टीम, इको दौंड ही पक्षी रेस्क्यू टीम आणि निमगाव केतकीचे फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे नचिकेत अवधानी, प्रशांत कौलकर, वैभव जाधव, आशिष हुंबरे, वेदांत घोरपडे यांनी जखमी पक्ष्यांना कोसळलेल्या झाडातून रात्री उशिरापर्यंत बाहेर काढले.
यामध्ये पंधराहून अधिक जखमी पक्षी वनविभागाच्या ताब्यात दिले. तर काही मृत पक्षी कचरा डेपोत नेऊन पुरण्यात आल्याचे समजते.
पक्षीमित्र संघटना व इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. याबाबत परीक्षाविधीन वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांनी सांगितले की, ही झाडे शहरात येत असल्याने याचा सर्व अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे येतो. तर मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
हे ही वाचा :