मान्सूनची आगेकूच मुंबई, पुण्याकडे | पुढारी

मान्सूनची आगेकूच मुंबई, पुण्याकडे

पुणे, पुढारी वृत्तसेवा : आठ दिवस प्रवास करून कच्छ आणि सौराष्ट्र किनारपट्टीवर आदळलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचे रुपांतर शुक्रवारी सायंकाळी कमी दाबाच्या पट्ट्यांत झाले. त्यामुळे आता मान्सूनच्या वाटेतील काटे दूर झाले आहेत. त्यामुळे मान्सूनची आगेकूच शनिवारी मुंबई, पुण्याच्या दिशेने होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागात ढगांची गर्दी होत असून गार वारे सुटले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास थांबला होता. कारण या वार्‍यांतील बाष्प चक्रीवादळाने पळवले व कमी दाबाचे पट्टेही तयार झाले नाहीत. शुक्रवारी सायंकाळी सर्वात मोठ्या चक्रीवादळाने पाकिस्तानऐवजी गुजरातमध्येच प्रवास थांबवत तेथेच त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. या वादळामुळे गुजरात व राजस्थान या दोन राज्यांत 19 जूनपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे.

चक्रीवादळाचा वेग कमी होऊन ते शांत होत असतानाच मान्सूनच्या हालचाली महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू किनारपट्टीवर दिसू लागल्या आहेत. त्याने आज किंचित प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. शनिवारी तो राज्यातील मुंबई, पुणेसह आणि काही भागात प्रगती करेल असा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात शुक्रवारी सायंकाळी गार वारे सुटून काही भागात हलका पाऊस झाला. त्यामुळे उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला. पुणे शहरात दुपारी 4 वाजता ढग दाटून आले. तसेच हलका पाऊस झाला.

विदर्भात उष्णतेची लाट

राज्यातील बहुतांश भागांचे कमाल तापमान हळूहळू कमी होत असून गार वारे सुटून हलका पाऊस पडण्यास सुुरुवात झाली आहे. मात्र, संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, अजून आठ दिवस त्या भागात अशी स्थिती कायम राहणार आहे. विदर्भाचा पारा 42 अंशावर अजून कायम आहे.

Back to top button