विद्यार्थ्यांनो, समजून घ्या: कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची आवड आणि प्रवेशाचे वास्तव

विद्यार्थ्यांनो, समजून घ्या: कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची आवड आणि प्रवेशाचे वास्तव
Published on
Updated on

डॉ. दिनेश भुतडा

पुढारी ऑनलाईन: जेईई मेन्सचे निकाल आलेत तसेच सीईटीचा निकालसुद्धा जाहीर झाला आहे. मात्र, 2022 प्रमाणेच यावर्षी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगकरिता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचाच पर्याय हा सर्वात जास्त जवळचा वाटत आहे. याचे कारणही असे की, उपलब्ध नोकऱ्या, वर्क फ्रॉम होमची संधी, परदेशातील नोकरीच्या संधी तसेच मोठ्या प्रमाणावर आयटीचे विस्तारणारे जाळे हे या विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये उपलब्ध झालेले नवीन नवीन कोर्सेस जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग तसेच त्यातील वेगाने विस्तारणाऱ्या संधी. अचानकपणे अनेक विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्सलाच जावेसे वाटत आहे आणि इतर शाखेची साधी माहिती सुद्धा घेण्याचे विद्यार्थी कष्ट करत नाहीत. मात्र, यामध्ये प्रवेशाचे वास्तव आपण जाणून घेणे गरजेचे आहे. 30 परसेंटाइल ते 99 परसेंटाइलच्या प्रत्येक विद्यार्थ्याला जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगलाच जावसं वाटत असेल, तर प्रवेशाचं वास्तव सुद्धा जाणून घेणं तितकच गरजेचे आहे. कारण प्रत्येकालाच या शाखेत प्रवेश मिळेल हे शक्य नाही. कारण मर्यादित जागा, प्रत्येकाने दिलेला तोच पहिला ऑप्शन, तसेच विविध आरक्षण या गोष्टींमुळे कटऑफ मध्ये झालेली वाढ.

पुण्यातील साधारणत: प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर, आयटी, तसेच AI & DS या शाखांपैकी किमान एक किंवा सर्व उपलब्ध होत आहेत. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शाखा मिळत नाही. ते इएनटीसीचा पर्याय निवडतात. मात्र कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये उपलब्ध जागा आपण जर धरल्या आणि होम यूनिवर्सिटी, होम यूनिवर्सिटी इतर यूनिवर्सिटी, तसेच जेईई ऑल इंडिया कोटा यातील आरक्षण या सर्वांमुळे उपलब्ध असणाऱ्या जागा या तुलनेने कमी असतात. म्हणून यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना आयटीत जायचं जरी असेल, तरी कोअर ब्रँच निवडून कोडींग प्रोग्रामिंगमध्ये आवड निर्माण करून तसेच त्या क्षेत्रातील मॉडेलिंग व सिमुलेशनचा अभ्यास करून सुद्धा आयटीमध्येच जाता येऊ शकतं. गेल्या 20 ते 30 वर्षांमध्ये इतर शाखेंमधून शिकून आयटीमध्ये प्रवेश केलेले अनेक लोक आपल्याला सहजच आपल्या आजूबाजूला दिसू शकतात.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रवेशाचे कटऑफ

गेल्या वर्षी पहिल्या पाच आयआयटीमध्ये या शाखेसाठी कटऑफ मेरीट रँक 300 च्या आत होती, तसेच पहिल्या पाच एनआयटीमध्ये याच कोर्समध्ये सिलेक्ट होण्याकरिता जोसा प्रोसेसमधील जेईचा रँक हा 3000 च्या आत असणे आवश्यक होता. पुण्यातीलच महाविद्यालयाचा विचार केला तर पुण्यातील पहिल्या 15 महाविद्यालयांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विषयाकरिता एमएचटी-सीईटीमध्ये 94% पर्सेंटाइलपेक्षा अधिक व जेईईमध्ये 90% पर्सेंटाइलपेक्षा अधिक हे तिसऱ्या फेरीपर्यंत आवश्यक होते. स्वाभाविकच हे मार्क मिळवणाऱ्या मुलांची ही रँक चार लाख मुलांपैकी जवळजवळ 10,000 च्या आत होती. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधील प्रवेशाचे वास्तव समजून घेताना 'कट ऑफ' चे वास्तव समजून घेणे, हे तितकेच महत्त्वाचे ठरेल.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व्यतिरिक्त चे पर्याय

कुठल्याही आयटी कंपनीमध्ये इतर शाखेचे विद्यार्थी घेऊन आणि त्यांना ट्रेनिंग देऊन आयटीमध्ये येण्यास योग्य केले जाते. शाखेची अट जवळजवळ कुठलीही आयटी कंपनी ठेवत नाही, मग ती प्रवेशासाठीच विद्यार्थी व पालकांनी ठेवताना विचार करायला हवा. मेकॅनिकल, केमिकल, सिविल, इलेक्ट्रिकल या शाखांमधून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आयटी क्षेत्रात यशस्वीरित्या काम करीत आहेत, तसेच या क्षेत्रातील नोकऱ्यासुद्धा या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात. या शाखांमधून 8.5 सीजीपीए आणणारा विद्यार्थी चांगला तर 9 सीजीपीएच्यावर आणणारा विद्यार्थी उत्तम समजल्या जातो व त्याची निवड आयटी किंवा कोर कंपनीत सहज होऊ शकते. शाखा आणि महाविद्यालय यामध्ये निवड करताना महाविद्यालयात प्लेसमेंट, भौतिक सुविधा इत्यादी उपलब्ध असतील तर महाविद्यालयाला प्राधान्य देत इतर शाखांचा विचार करून प्रवेश घेतल्यास यश नक्की मिळू शकते , यात शंका नाही. यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कटऑफचे वास्तव समजून घेताना, इतर मार्गांचासुद्धा विचार विद्यार्थी व पालकांनी जरूर करावा.

(लेखक हे एमआयटी विद्यापीठात केमिकल इंजिनिअरिंगचे सहप्राध्यापक आहेत.)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news