Cyclone Biparjoy | बिपरजॉय राजस्थानकडे सरकले, मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा | पुढारी

Cyclone Biparjoy | बिपरजॉय राजस्थानकडे सरकले, मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा

पुढारी ऑनलाईन : गुजरातमध्ये गुरुवारी रात्री धडकलेले ‘अत्यंत तीव्र’ चक्रीवादळ बिपरजॉय आता कमकुवत होऊन डीप डिप्रेशनमध्ये बदलेल आहे. सध्या ते भूजच्या पश्चिम-वायव्येस ३० किलोमीटरवर घोंघावत आहे, अशी माहिती हवामान विभागाचे (IMD) महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारी दिली. “बिपरजॉय आता कमकुवत झाले आहे. त्याची तीव्रता कमी झाली आहे. बिपरजॉय प्रतिताशी ८०-९० किमी वाऱ्याच्या वेगाने पूर्व ईशान्य दिशेने जात आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे. “संध्याकाळपर्यंत ते कमकुवत होऊन वाऱ्याचा वेग प्रतिताशी ५०-६० किमी अथवा ७० किमी होईल. त्यानंतर ते ‘डीप डिप्रेशन’मध्ये बदलले,” असेही त्यांनी पुढे नमूद केले.

“सौराष्ट्राच्या उत्तरेकडील भाग, कच्छ आणि उत्तर गुजरातच्या लगतच्या भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी सुरु आहे, असेही महापात्रा यांनी म्हटले आहे. संध्याकाळपासून हे वादळ राजस्थानच्या लगतच्या भागाकडे सरकेल आणि या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण राजस्थानमध्ये शनिवारपर्यंत पाऊस सुरू राहील. राजस्थानमधील काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

“यामुळे राजस्थानमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होईल. हे वादळ राजस्थानला पोहोचल्यावर वाऱ्याचा वेग प्रतिताशी ४०-५० ते ६० किमीपर्यंत राहील. बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी रात्री १०:३० ते ११:३० च्या दरम्यान जखाऊ बंदर ओलांडले होते. या वादळाने मुसळधार पावसासह प्रतिताशी ११५-१२० किलोमीटर वेगाने वारे आणले. (Cyclone Biparjoy)

बिपरजॉयने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात हाहाकार उडवला. येथे सुमारे ३०० विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. यामुळे सुमारे ४५ गावांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. तत्पूर्वी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती आणि ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरातच्या किनारी भागात धडकल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला होता.

दरम्यान, चक्रीवादळाने कच्छ आणि सौराष्ट्रात हाहाकार उडाला असून जोरदार वाऱ्यामुळे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी मोबाईल टॉवर, वीज आणि ट्रान्समिशनचे खांब कोसळले आहे. कच्छमधील घरांची पडझड झाली आहे. चक्रीवादळाशी संबंधित घटनांमध्ये गुजरातमध्ये २३ जण जखमी झाले आहेत.

संपूर्ण किनारपट्टीवर हाहाकार

अरबी समुद्रात निर्माण झालेले महाकाय बिपरजॉय चक्रीवादळ अखेर गुरुवारी रात्री गुजरातच्या किनार्‍यावर धडकले. या वादळाने संपूर्ण किनारपट्टीवर हाहाकार माजवला असून शेकडो झाडे, खांब उन्मळून पडले आहेत. कमानी, होर्डिंग्ज पडण्यासोबतच कच्ची बांधकामे असलेल्या इमारतींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळासोबत आलेल्या अतिमुसळधार पावसाने अनेक शहरे व गावे जलमय झाली असून वस्त्यांमध्येही पाणी घुसले आहे.

बिपरजॉय धडकण्याआधी गुरुवारी सकाळपासूनच गुजरातच्या किनारी भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. तुफानी वार्‍यांसह सुरू असलेल्या मुसळधार पावसाने किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांना झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले, अनेक घरांवरील पत्रे उडून गेली. चक्रीवादळ किनार्‍यावर धडकण्याची वेळ येण्याआधीच ७० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत होते व सोबतीला अंदाधुंद पाऊस बरसू लागला.

कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, मोरबी, राजकोट, जुनागड, वलसाड या गुजरातच्या भागासह लगतच्या दमण दीवलाही या वादळाचा जोरदार फटका बसला. रात्री ९ वाजेच्या सुमारास जखाऊ बंदरानजीक चक्रीवादळ धडकले आणि त्याचा जमिनीवरील प्रवास सुरू झाला. १२५ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहू लागल्याने वातावरणात भयकारी स्थिती निर्माण झाली. या वादळाची तीव्रता कमी होत उत्तरेकडे राजस्थानपर्यंत पोहोचणार असून वादळाच्या मार्गावर सर्वत्र जोरदार वारे आणि पाऊस सुरू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) पूर्णपणे किनारपट्टी ओलांडून पुढे सरकले.

१ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

गुरुवारी मध्यान्हीपर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या लोकांचा आकडा १ लाखांपर्यंत पोहोचला. एकट्या कच्छ जिल्ह्यातील ४६ हजार ८०० जणांना हलवण्यात आले आहे. त्यात १० हजार बालके, १२०० गरोदर महिला आणि ६ हजार वृद्धांचा समावेश आहे. याशिवाय कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, मोरबी, राजकोट, जुनागड, वलसाड येथे एकूण १५५० मदत केंद्रे उभारण्यात आली असून तेथे या सर्वांना आश्रय देण्यात आला आहे.

हे ही वाचा :

Back to top button