

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरात मान्सून दाखल होण्यापूर्वी 15 मे नंतर रस्ते खोदाई बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. मात्र, आयुक्तांचे आदेश झुगारुन एका खासगी कंपनीने मोरवाडी परिसरात विनापरवाना रस्ते खोदाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्रीत खोदाई करून केबल टाकण्यात आली आहे. त्याबाबत स्थापत्य विभागामार्फत पोलिसांकडे तक्रार केली आहे. पावसाळ्यात रस्ते खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था व दुर्घटना घडू नये, यासाठी आयुक्त सिंह यांनी 15 मे ते 15 ऑक्टोबर या पावसाळ्यातील कालावधीत रस्ते खोदाई बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच, अपवादात्मक परिस्थितीत रस्ते खोदाईसाठी महापालिकेची परवानगी घ्यावी, असे म्हटले होते. तसेच, आदेशानुसार शहरात 15 मेपासून रस्ते खोदाई बंद करण्यात आल्याचा दावा अधिकार्यांनी केला होता. मात्र, रात्रीच्या वेळी खासगी कंपन्या व ठेकेदार विनापरवाना रस्ते खोदाई करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
पिंपरी येथील मोरवाडी चौक ते सम—ाट चौक या दरम्यान अनधिकृतपणे रस्त्याचा पदपथ खोदून केबल टाकण्याचा प्रकार 7 जूनला घडला आहे. अनधिकृतपणे रस्त्याची दुरवस्था अज्ञात व्यक्ती किंवा ठेकेदाराने केली आहे. त्याचा शोध महापालिका घेत आहे. पोलिसांनीदेखील संबंधित व्यक्ती किंवा ठेकेदाराचा शोध घेऊन त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, असे स्थापत्य विभागाने तक्रारीत म्हटले आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व यंत्रणांना 15 मे ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रस्ते खोदाई बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मोरवाडी, पिंपरी येथे विनापरवाना खोदकाम केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, पोलिसांकडे तक्रार केली आहे, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
हेही वाचा