

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 15 जून उजाडूनही मान्सूनच्या पावसाची हजेरी नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या असून, शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जमिनीतील चांगल्या ओलाव्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पाण्याच्या उपलब्धतेअभावी पश्चिम पट्ट्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या तालुक्यातील भातरोपवाटिकांची संख्या केवळ 55 हेक्टर इतकीच आहे. ती गतवर्षी 85 हेक्टर इतकी होती. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे पिकांखालील क्षेत्र 2.25 लाख हेक्टर असून, त्यापैकी प्रमुख पीक असलेल्या भातपिकाखाली 60 हजार हेक्टर क्षेत्र राहते.
जिल्ह्यात आतापर्यंत 14.4 मिलिमीटर इतकाच अल्प पाऊस झाला असून, गतवर्षी तो 33 मिलिमीटर इतका होता. पावसाची हजेरी नसल्यामुळे शेती मशागतीच्या कामांनाही खीळ बसली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी खरीप हंगामात शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीतील चांगल्या ओलाव्याशिवाय खरिपाच्या पेरण्या करू नयेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी शेतकर्यांनी भातरोपवाटिका टाकलेल्या आहेत. हे प्रमाणसुध्दा अत्यल्प आहे. जिल्ह्यात प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचे 47 हजार हेक्टर, बाजरी 35 हजार हेक्टर, मका 27 हजार हेक्टर, मूग 12 हजार आणि उडदाचे 8 हजार हेक्टर इतके क्षेत्र आहे. बियाण्यांची 28 ते 29 हजार क्विंटलइतकी म्हणजे गरजेच्या शंभर टक्क्यांइतकी उपलब्धता तालुकास्तरापर्यंत झालेली आहे. तर, नियोजनानुसार खतांची सत्तर टक्के उपलब्धता आहे.
– संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक
हे ही वाचा :