पंतप्रधानपदाचे विरोधकांचे उमेदवार खर्गेच ? | पुढारी

पंतप्रधानपदाचे विरोधकांचे उमेदवार खर्गेच ?

नवी दिल्ली; जाल खंबाटा : लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे. असे असले तरी येत्या २३ जून रोजी बिहारमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत मात्र चर्चा होणार नाही. किमान समान कार्यक्रमावरच विचारविनिमय होणार असल्याचे सांगण्यात आले.

भाजपेतर आघाडी स्थापन करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना म्हणावे तितके यश येताना दिसत नाही. त्यामुळेच २३ जून रोजीच्या बैठकीत प्रथम किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. असे झाल्यास विरोधी पक्षाचे नेते भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटतो. त्यामुळेच २३ जून रोजीच्या बैठकीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

या बैठकीचे निमंत्रक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे आहेत. त्यांनीही शरद पवार यांच्याबरोबरीनेच बैठकीसाठी बराच पुढाकार घेतला आहे. त्यांनी काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. काही जणांशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यांच्या या हालचालीमुळे पंतप्रधानपदासाठी ते उत्सुक असतील आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून स्वतःचे नाव पुढे करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा, असा कयास बांधला जात होता. मात्र स्वतः नितीशकुमार आणि त्यांच्या पक्षाने ही शक्यता फेटाळली आहे. भाजपला समर्थ पर्याय उभे करणे हे आमचे प्रथम टार्गेट आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचा आम्ही विचारही केलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे पंतप्रधानपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून खर्गे यांच्या नावालाच पसंती मिळेल, असे सांगितले जाते. काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाबाबत विरोधी पक्षांशी बोलणीही सुरू केली आहेत. कदाचित विरोधकांच्या २३ जूननंतरच्या बैठकीत हा विषय उपस्थित होईल, अशी शक्यता आहे.

Back to top button