पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक उद्यान निरीक्षक मांजरेचे निलंबन

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक उद्यान निरीक्षक मांजरेचे निलंबन

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील सहायक निरीक्षक किरण अर्जुन मांजरे (वय 46) याला 17 हजार रुपयांची लाच घेताना 7 जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्या गुन्ह्यात त्याला 48 तास पोलिस कोठडी देण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्याला बुधवारी (दि. 14) महापालिका सेवेतून निलंबित केले. मात्र, याप्रकरणी दोघांना अटक झालेली असताना निलंबन एकाचेच केल्याने महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महापालिकेच्या उद्यानांच्या देखभालीचे काम केलेल्या ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी सहायक उद्यान निरीक्षक मांजरे याने 17 हजारांची लाच मागितली होती. याबाबत त्या संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, 7 जूनला सापळा रचून मांजरे याला अटक करण्यात आली.

दरम्यान, पालिकेतील मांजरेच्या लाचखोरीच्या प्रकरणात उद्यान विभागाचा उपलेखापाल संजय देवराम काळभोर (वय 56) याचाही सहभाग आढळल्याने त्यालाही दुसर्‍या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दोघांनाही 48 तास पोलिस कोठडी झाली. मात्र, सहायक निरीक्षक मांजरे या एकट्याचे आयुक्तांनी निलंबन केले आहे. तसेच, विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, संजय काळभोर याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

संजय काळभोरवरील कारवाईबाबत पत्रव्यवहार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किरण मांजरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, संजय काळभोर याच्यावर गुन्हा दाखल नसून, केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कारवाई करायची, याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news