पिंपरी-चिंचवड महापालिका तयार करणार वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन

पिंपरी-चिंचवड महापालिका तयार करणार वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व आरोग्य सेवेशी निगडित असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची कार्यशाळा चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झाली. कार्यशाळेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मार्गदर्शन केले.

एनएचएसआरसीद्वारे प्रदान केलेल्या 'सिटी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन' आराखड्यावर काम करावे, अशा सूचना पालिकेस राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार 'वॉर्ड अ‍ॅण्ड सिटी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन' तयार करण्याकरिता युनिसेफच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या वतीने आराखडा तयार करण्यात येत आहे. 'वॉर्ड अ‍ॅन्ड सिटी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन'मधील तत्त्वे भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात मार्गदर्शक व दिशादर्शक म्हणून वापरण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी 'वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन टास्क फोर्स' समितीची स्थापना केली आहे.

या वेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, किरणकुमार मोरे, राजेश आगळे, शीतल वाकडे, सीताराम बहुरे, उमेश ढाकणे यांच्यासह विविध ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, युनिसेफच्या शहरी सल्लागार देविका देशमुख आदी उपस्थित होते.

आठ झोननुसार आठ समित्या

शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये तर, वैद्यकीय विभागामार्फत राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी 8 रुग्णालय झोन स्तर निश्चित करून आरोग्य सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर क्षेत्रीय अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, रुग्णालय प्रमुख, नोडल वैद्यकीय अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करून 8 समित्या स्थापन केल्या आहेत, असे आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

पालिका युनिसेफची मदत घेणार

शहरातील झोपडपट्टी भागामध्ये आरोग्य सेवेच्या दृष्टीने अधिक काम करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी करताना विविध समस्या निर्माण होतात. त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही टास्क फोर्स समिती कार्यरत असेल. युनिसेफच्या मदतीने शहराचा 'वॉर्ड अ‍ॅन्ड सिटी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला जात आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news