पिंपरी : बोपखेल-खडकी पुलावरील वाहतुकीसाठी आणखी दीड वर्ष प्रतीक्षा | पुढारी

पिंपरी : बोपखेल-खडकी पुलावरील वाहतुकीसाठी आणखी दीड वर्ष प्रतीक्षा

मिलिंद कांबळे

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदीवर बोपखेल ते खडकी असा पूल बांधण्यात येत आहे. पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. तर, पुलाला जोडणार्‍या रस्त्याचे काम सुमारे 30 टक्के पूर्ण झाले आहे. संरक्षण विभागाच्या पाहणीनंतर या पुलावरून वाहतुकीस हिरवा कंदील दिला जाणार आहे. पूल वाहतुकीस खुला होण्यास रहिवाशांना आणखी दीड वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुलाचे तसेच, जोड रस्त्याचे (अप्रोच रस्ता) काम सध्या सुरू आहे.

पुलाचे काम जानेवारी 2014 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर, जोड रस्त्याच्या कामास जून 2024 पर्यंत मुदत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभागाकडून या संपूर्ण मार्गाची पाहणी केली जाणार आहे. त्यात काही त्रुटी असल्यास ते करण्याबाबत महापालिकेस सुचविले जाईल. सर्व कामे व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभाग व महापालिकेचा करार होईल. त्यानंतर संरक्षण विभागाकडून महापालिकेस ना हरकत दाखला (एनओसी) दिल्यानंतर या पुलावरून वाहतुक खुली केली जाईल. लष्कराच्या एनओसीनंतर पूल वाहतुकीस खुला होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आठ वर्षांपासून बोपखेलचा रस्ता बंद

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगच्या (सीएमइ) हद्दीतून जाणारा बोपखेल ते दापोडी हा मार्ग आठ वर्षांपासून बंद आहे. सीएमईने 13 मे 2015 ला बोपखेल ते दापोडी हा जुन्या काळापासून सुरू असलेला रस्ता बंद केला. नागरिकांना नाईलाजास्तव दिघी, विश्रांतवाडी मार्गे पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे कामगार, विद्यार्थी व व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका नागरिकांसाठी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर 1 हजार 866 मीटर म्हणजे सुमारे 2 किलोमीटर अंतराचा पूल बांधत आहे.

न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास होणारा विलंब आदी कारणांमुळे काम रखडले होते. बोपखेलच्या बाजूने काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभागाच्या खडकीकडील कामास 2 ऑक्टोबर 2021 ला परवानगी मिळाली. त्यानंतर काम सुरू करण्यात आले. 512 आर्मी बेस वर्कशॉप, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी तसेच, संरक्षण विभागाच्या इतर आस्थापनांच्या जवळून हा पूल जात असल्याने सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पाच मीटर उंचीची सीमाभिंत उभारली आहे. त्यावर 1.5 मीटर उंचीचे व्हीजन बॅरिकेट बसविण्यात येत आहे. पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. उच्चदाब विद्युत वाहक सहा टॉवर हटविल्यानंतर पुढे चार महिन्यांत पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुलासाठी 53 कोटी 53 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

‘सी’ आकाराचा दोन किलोमीटरचा पुल

बोपखेल व खडकीला जोडणारा मुळा नदीवरील तब्बल 1 हजार 866 मीटर लांबीचा हा इंग्रजी ‘सी’ आकाराचा पुल आहे. नदीपात्रावर 196 मीटर लांबीचा पुल आहे. नदी पात्र, लष्कराचा रेल्वे मार्ग, वन क्षेत्र, रस्ता व विविध संरक्षण विभागावरून पुल जातो. रस्त्याची रूंदी 8 मीटर आहे. दोन लेनचा मार्ग आहे. पुलावर पादचार्‍यांसाठी पदपथ नाही. केवळ दुचाकी, तीन व चारचाकीसाठी वाहनांना पुलाचा वापर करता येणार आहे.

विद्युत टॉवर न हटविल्याने नऊ महिन्यांचा विलंब

पुलाच्या कामाची मुदत एप्रिल 2023 पर्यंत होती. मात्र, खडकी भागात अडथळा ठरणारे अतिउच्च दाब विद्युत वाहक तारा व टॉवर हटविण्यास विलंब झाला आहे. ते 6 टॉवर हटविण्याचे काम विद्युत विभागामार्फत सुरू आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुलाचे उर्वरित 10 टक्के काम चार महिन्यांत पूर्ण होऊ शकणार आहे. टॉवर वेळेत न हटविल्याने पुलाच्या कामास तब्बल नऊ महिन्यांपेक्षा अधिक विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जोड रस्त्याचे काम 30 टक्के पूर्ण

पुलास जोडणारा खडकीच्या बाजूने जोड रस्ता आहे. त्या कामाची निविदाप्रक्रिया वेगळी आहे. त्यात लष्कराच्या विविध आस्थापनांना जोड रस्ता बनविण्यात येणार आहे. मिलिटरी वॉच टॉवर असणार आहे. स्टोअर रूम, दोन्ही बाजूने 3 मीटर उंचीची भिंत, पार्किंगची व्यवस्था, छोटे पुल, टॉयलेट ब्लॉक्स आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी 21 कोटी खर्च अपेक्षित आहे. या बोपखेलच्या बाजूने 60 मीटर व खडकीच्या बाजूने 550 मीटर लांबीचा जोड रस्ता आहे. हे काम जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूल व जोड रस्त्याचे काम एलअ‍ॅण्डटी इन्फ्रा कंपनी करीत आहे.

विद्युत टॉवर हटविल्यानंतर चार महिन्यांत पूल होणार तयार

उच्चदाब वाहक विद्युत तारा व टॉवरचा पुलाच्या निर्मिती कामास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुलाचे उर्वरित 10 टक्के काम शिल्लक आहे. विद्युत विभागास काम तातडीने पूर्ण करण्याचा सूचना केल्या आहेत. विभागाने सप्टेंबर 2023 पर्यंत टॉवर हटविण्यात येतील, असे उत्तर दिले आहे. त्यानंतर पुलाचे चार महिन्यांत काम पूर्ण होईल, असे महापालिकेचे स्थापत्य प्रकल्प विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

हेही वाचा

पुण्यात साकारली माउलींची पाचफुटी मूर्ती

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे : पतीने दुसरे लग्न केल्याने कॅबला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Back to top button