

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीनिमित्त आलेल्या दीडशे वारकर्यांच्या गळ्यातील तब्बल अडीच किलो सोने चोरट्यांनी गतवर्षी ओरबाडून नेले होते. या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली. त्यामुळे केवळ दोन अपवाद वगळता सोनसाखळी चोरीच्या घटनांना अटकाव बसला आहे. एकंदरीत यंदा वारकर्यांच्या सुरक्षेसाठी असलेला पोलिसांचा ताफा पाहून चोरटे अंडरग्राऊंड झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहू आणि आळंदी भागात येत असतात. गर्दीचा गैरफायदा घेऊन सोनसाखळी हिसकावण्यासाठी काही रेकॉर्डवरील गुन्हेगार गर्दीत फिरत असतात. गेल्या वर्षी दीडशे जणांच्या गळ्यातील सोने चोरट्यांनी हिसकावून नेले होते. त्यामुळे यंदा विशेष काळजी घेण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले.
आषाढी वारीसाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी राज्य पोलिस दलाकडून अतिरिक्त बंदोबस्त मागवला होता. अतिरिक्त मनुष्यबळ वाटप करतानादेखील या वेळी विशेष खबरदारी घेण्यात आली. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करीत होते. तसेच, गुन्हे शाखेचे अधिकारी वारकर्यांच्या वेशात संशयित हालचाली टिपत होते.
राज्यातील विविध पोलिस ठाण्यात रेकॉर्ड असलेल्या चोरट्यांचे फोटो पोलिसांनी आपापसात शेअर केले होते. त्यानुसार, संशयित वाटणार्या इसमांना पोलिस वेळीच ताब्यात घेत होते. ताब्यात घेण्यात आलेल्यापैकी महिलांना सायंकाळी साडेसहानंतर सोडून देण्यात आले. तर काही पुरुषांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याचादेखील मोठा फायदा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गतवर्षी देहू आणि आळंदी येथून निघालेल्या पालखीत सहभागी झालेल्या 150 वारकर्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यात आले होते. यामध्ये अडीच किलो सोने चोरीला गेले होते. दरम्यान, 118 आरोपींना अटक करीत पोलिसांनी चोरीचे दागिने हस्तगत केले होते. या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही कॅमेर्याचा मोठा फायदा झाला होता.
पोलिस ठाणे फिर्यादी चोरीला गेलेल्या सोन्याचे वजन (ग्रॅम)
आळंदी 8 51
दिघी 107 1836
देहूरोड 32 478
निगडी 03 37
एकूण 150 2402
पोलिस ठाणे फिर्यादी चोरीला गेलेल्या सोन्याचे वजन (ग्रॅम)
दिघी 06 68
भोसरी 01 16
एकूण 7 84
गतवर्षी पालखी सोहळ्यात घडलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करून ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पोलिस आयुक्तांसह सर्वच अतिवरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले होते. ज्यामुळे तैनात असलेले सर्वजण 'अलर्ट' असल्याचे पहावयास मिळाले. खबरदारीचे उपाय म्हणून 12 विशेष पथके गस्तीवर होती. तसेच, दोन्ही पालख्यांसोबत चोख बंदोबस्त नेमल्याने यावर्षी सोनसाखळी चोरी रोखण्यास आम्हाला मोठे यश मिळाले आहे.
– स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड.
हेही वाचा