पुणे : लाच मागितल्याने तीन हवालदार जाळ्यात ; अपघाताची तक्रार घेण्यासाठी मागितले 20 हजार | पुढारी

पुणे : लाच मागितल्याने तीन हवालदार जाळ्यात ; अपघाताची तक्रार घेण्यासाठी मागितले 20 हजार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कार अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 13 हजार रुपयांची लाच घेणार्‍या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याला साहाय्य करणार्‍या अन्य दोन पोलिस हवालदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. मध्यरात्रीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करण्याची ही 5 वर्षांतील पहिलीच वेळ आहे. पोलिस हवालदार राजेंद्र दीक्षित असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर पोलिस हवालदार जयराम सावलकर आणि पोलिस हवालदार विनायक मुधोळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तीन पोलिस हवालदारांनी तक्रारदाराकडे 20 हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर सोमवारी त्याची पडताळणी केली. त्यात त्यांनी तडजोड करून 13 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. रात्री उशिरापर्यंत पोलिस नजर ठेवून होते. पोलिसांनी तक्रारदाराची तक्रार मध्यरात्रीनंतर दाखल करून घेतली. त्यानंतर हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदाराकडून 13 हजार रुपये स्वीकारले. तसा इशारा तक्रारदाराने केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दीक्षित याला ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, मुकुंद आयाचित, पोलिस शिपाई भूषण ठाकूर, पांडुरंग माळी यांनी ही कारवाई केली.

एकाचवेळी तिघा हवालदारांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. अनेकदा तक्रारदाराला ताटकळत ठेवले जात असल्याचे प्रकार घडत होते. मात्र, आता तक्रार दाखल करून घेण्यासाठी लाच घेतली जात असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा : 

गव्हाच्या साठ्यावर केंद्राचे निर्बंध!

पुणे पूर्व भागात आज वाहतुकीत बदल

Back to top button