

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीसाठी पंढरपूर शहरात वारकऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असणाऱ्या पोलिस बांधवांना 'पुनीत बालन ग्रुप'कडून ५ हजार किट देण्यात आले आहेत. या किटमध्ये दैनंदिन वापराच्या आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश असून त्यामुळे पोलीस बांधवांची गैरसोय टळणार आहे.
युवा उद्योजक आणि 'पुनीत बालन ग्रुप'चे अध्यक्ष पुनीत बालन हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. या ग्रुपच्या माध्यमातून खेळाडू, विद्यार्थी, कलाकार, कर्मचारी वर्ग आणि पोलीस कर्मचारी वर्ग यांच्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यासमवेत लाखो वारकरी-भाविक पंढरपुरात येत असतात. यावर्षी दि. २८ व २९ जूनला मुख्य एकदशी आहे. यानिमित्ताने दि. २० जून ते ४ जुलै या कालावधीत पंढरपूरची यात्रा असणार आहे.
या कालावधीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड, आरपीसी पथक, क्यूआरटी पथक असा एकूण ८ हजार अधिकारी आणि कर्मचारी यांचा चोवीस तास बंदोबस्त असणार आहे. या सर्वांसाठी दैनदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे किट मिळावे अशी मागणी पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पुनीत बालन यांच्याकडे केली होती. बालन यांनी तात्काळ हे किट देण्याची मागणी मान्य केली असून ते लगेचच उपलब्ध करुन देण्याची व्यवस्थाही केली आहे. जवळपास ४ हजार दोनशे पुरुष कर्मचारी आणि आठशे महिला कर्मचारी यांना हे किट मिळणार आहेत.
या किटमध्ये प्रामुख्याने कोलगेट, टूथ ब्रश, ग्लुकोज-डी, बिस्कीट पाकीट, चिक्की पाकीट, पाण्याची बाटली, हॅंडवॉश, शेविंगकिट, तेलाची बाटली, मास्क, सॅनीटायझर, साबण, ऑडोमास, सॅनिटरी नॅपकीन या दैनदिन वापरातील वस्तूंचा समावेश आहे.
"वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा. या वारकरी बांधवांची सुरक्षा राखण्यासाठी येणाऱ्या पोलीस बांधवासाठी दैनदिन वापराच्या वस्तूंचे किट देण्याची संधी मिळणे म्हणजे एकप्रकारे विठ्ठलाची सेवा करण्याची संधी, अशीच माझी भावना आहे. या सर्वाना सर्वोतोपरी मदत करण्याचे माझे नेहमीची प्रयत्न राहतील."
– पुनीत बालन
अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.
हेही वाचा