Ashadhi wari 2023 : पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणी काळभोरची यंत्रणा सज्ज | पुढारी

Ashadhi wari 2023 : पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणी काळभोरची यंत्रणा सज्ज

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणी काळभोरची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळा स्वागतासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर यांनी दिली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. पुणे शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ग्रामीण भागातील पहिला मुक्काम हा लोणी काळभोर येथे आहे. बुधवारी (दि. 14) गावातील श्री विठ्ठल मंदिर येथे मुक्कामासाठी पालखी दाखल होत आहे. लाखो वारकऱ्यांसाठी लोणी काळभोरच्या प्रशासकीय यंत्रणेने योग्य नियोजन केले आहे.

पुणे शहर आयुक्तालय पोलिस दल व लोणी काळभोर पोलिस यंत्रणेकडून पोलिस बंदोबस्ताची चोख व्यवस्था केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने येणार्‍या वाहनांसाठी चौफुला-न्हावरामार्गे नगर रस्त्याने पुणे अशी, तर पुण्याच्या दिशेने सोलापूरकडे जाणार्‍या वाहनासाठी मुंढवा रस्त्याने नगर रस्त्याकडून चौफुलामार्गे सोलापूरला वळविण्यात आली आहे.

कवडी पाट ते खेडेकर मळा उरुळी कांचन या मार्गावर पालखी सोहळ्यासाठी अप्पर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी, होमगार्ड, एसआरपीएफ प्लाटून पथक, पोलिस मित्र असे नियोजन करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली.

आरोग्य विभागाकडून पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग व लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कवडी पाट ते लोणी काळभोर ते खेडेकर मळा उरुळी कांचन परिसरातील हॉटेल, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, विहिरी, बोअरवेल, पाण्याचे स्रोत आणि साठे यांची तपासणी करून पाण्याच्या नमुना चाचणी केली आहे. पालखी मार्गावर आरोग्य विभागाकडून वारकर्‍यांसाठी आरोग्य विभागाचे तीन टप्पे केले असून, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा आरोग्य साहाय्यक, आरोग्य अधिकारी यांची व्यवस्था केली आहे.

वारकर्‍यांसाठी दोन खासगी रुग्णालयात खास व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. विश्वराज रुग्णालय, शिवम रुग्णालयात अतिदक्षता विभाग राखीव ठेवले आहेत, तर कार्डीऑक रुग्णवाहिका सेवेत असणार आहे. मोफत औषध किट अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली बंगाळे व डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली. माळीमळा येथील सुयश हॉस्पिटल येथे वारकर्‍यांसाठी 24 तास विनामूल्य मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी दिवाबत्ती, आवश्यक त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आले आहेत तसेच वारकरी मंडळींच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली असून, जागोजागी शौचालय, त्यासाठी लागणार्‍या पाण्याची व्यवस्था असे नियोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात हागणदारीमुक्त सोहळा पार पाडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून, त्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय बोर्ड, पाण्यासाठी बोअरवेलची व्यवस्था उपलब्ध केली आहे. उघड्यावर घाण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत पथक वारकरी मंडळींना सहकार्य करून शौचालयाचा वापर करण्यासाठी मदत करणार आहे.

वारकरी मंडळी व दिंड्यांच्या मुक्कामासाठी तसेच जर पाऊस आला तर काही अडचण येऊ नये म्हणून गावातील सर्व शाळा, सर्व मंदिरे, समाजमंदिर वारकर्‍यांसाठी खुले करण्याचे नियोजन लोणी काळभोर ग्रामपंचायत प्रशासनाने केली असल्याची माहिती लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी, उपसरपंच ललिता राजाराम काळभोर यांनी दिली.

मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी व दिंड्यांसाठी पुरवठा विभागाने लोणी काळभोर गावात पाषाणकर गॅस एजन्सी येथे सिलिंडरचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी पुरवठा विभागाने कार्ड दिले आहे, तसेच अत्यावश्यकेनुसार तत्काळ सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिले आहेत, अशी माहिती हवेलीच्या तहसीलदार किरण सुरवसे व निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे यांनी दिली.

हेही वाचा

सिंधुदुर्ग : समुद्राला उधाण, किनारपट्टीवर उंच लाटा; पर्यटकांची मात्र स्टंटबाजी

शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत वाढ; पालकांवर आणखी एक बोजा

बारामती शहरातील रस्त्यांची चाळण; प्रवाशांची होतेय तारेवरची कसरत

Back to top button