शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत वाढ; पालकांवर आणखी एक बोजा | पुढारी

शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत वाढ; पालकांवर आणखी एक बोजा

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक साहित्याच्या किंमतीमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. वाढत्या महागाईनंतर आता शैक्षणिक साहित्यांच्या किंमती दुपटीने वाढल्याने पालकांवरील शिक्षणाच्या बोजात आणखी वाढ झाली आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात येत आहे.

शाळेतून केवळ आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळत असल्याने आठवीनंतरच्या विद्यार्थ्यांना बाजारातून पाठ्यपुस्तकांची खरेदी करावी लागते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बाजारपेठेतून नोटबुक, कंपास, ड्रॉइंग वही, साध्या वह्या, पेन, पेन्सिल व अन्य साहित्याची खरेदी करावी लागते. मात्र, दरवर्षी शैक्षणिक साहित्याच्या किंमती वाढत असल्याने पालकांच्या खांद्यावरील शिक्षणाचा बोजा वाढतच चालला आहे.

गरीब कुटुंबानादेखील आता शिक्षणाचे महत्त्व कळल्याने ते मोलमजुरी करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देतात. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या किंमती व प्रवेश शुल्काने त्यांच्यासमोर समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. शाळा सुरू होण्यासाठी अवघे आठ दिवस राहिल्याने अनेक विद्यालयांमध्ये दहावी, बारावी व पाचवीचे व सहावीचे ज्यादा तास व स्कॉलरशिपचे ज्यादा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात सुरुवात केली आहे. निरगुडसर, पारगाव, लोणी, धामणी व इतर गावांतील दुकाने शैक्षणिक साहित्याने सजू लागली आहेत.

अशी झाली वाढ

साहित्य दर रुपये (मागील वर्षी) दर रुपये (यावर्षी)
कंपास 95 ते 100 110 ते 120 रुपये,
100 पानी वही 30 ते 32 35 ते 36
200 पानी वही 48 ते 50 60 ते 65
ड्रॉईंग वही 25 ते 30 40 ते 45 रुपये
पेन, पेन्सिलच्या किंमतीत 3 ते 5 रुपये वाढ
(स्रोत : संगम जनरल स्टोअर्स, निरगुडसर.)

Back to top button