बारामती शहरातील रस्त्यांची चाळण; प्रवाशांची होतेय तारेवरची कसरत | पुढारी

बारामती शहरातील रस्त्यांची चाळण; प्रवाशांची होतेय तारेवरची कसरत

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहराच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे. एकीकडे भिगवण रस्त्याच्या सेवा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अगोदरच वाहतूक व्यवस्था खिळखिळी बनली असतानाच शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे.

धोकादायक खड्डे व गतिरोधक प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून, खडी रस्त्यावर आली आहेत. बहुतांश ठिकाणी चेंबरही उघडे पडलेले चित्र बारामतीत पाहायला मिळत आहे. शहर आणि उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर खड्ड्यात ठिकठिकाणी पाणी साठले होते. जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरणार नाहीत, याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. अगोदरच वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहरांतर्गत विविध नगरांत जाणार्‍या रस्त्यांचीही अशीच अवस्था झाली आहे. शहरातील दुभाजकांची ठिकठिकाणी दुरुस्ती झाली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय शहरातील महत्त्वाचे चौक, वर्दळीचे रस्ते, बायपास रस्ते यांचीही दुरवस्था झाली आहे. शहरातील काही भागातील चेंबर उघडे असून, त्यावरून वाहनचालकांचा धोकादायक पध्दतीने प्रवास सुरू आहे.

एकीकडे मुख्य रस्त्यांची वारंवार दुरुस्ती होत असताना शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीची वाट पाहात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. याशिवाय गणेश भाजी मंडईच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच पार्किंगच्या समस्येने बारामतीकर हैराण झाले असतानाच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे यात पुन्हा भर पडत आहे. रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाने निधी उपलब्ध करून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी बारामतीकर करत आहेत.

हेही वाचा

बिपरजॉयच्या भीतीने पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळी १५ जूनपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्ग : समुद्राला उधाण, किनारपट्टीवर उंच लाटा; पर्यटकांची मात्र स्टंटबाजी

आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली

Back to top button