

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून युवकांचे धर्मांतरण करीत असल्याच्या प्रकरणातील आरोपी शाहनवाज उर्फ बद्दो याच्या चौकशीला गाझियाबाद पोलिसांनी (Ghaziabad Conversion Case) सुरुवात केली आहे. बद्दोला अलीकडेच अलिबागमध्ये सापळा रचून पकडण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्याला गाझियाबाद पोलिसांकडे सुपूर्द केले होते.
गेमिंग अॅप्सच्या (Ghaziabad Conversion Case) माध्यमातून बद्दो लहान मुले तसेच युवकांचे धर्मांतरण करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ठाण्यातील न्यायालयाने ७२ तासांसाठी बद्दोची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली होती. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला गाझियाबादला आणण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत आपल्यावरील सर्व आरोप त्याने नाकारले असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांच्या तपासाची दिशा भटकविण्याचाही तो प्रयत्न करत आहे.
राजनगर येथील एका उद्योगपतीने आपल्या एकुलत्या एक मुलाचे गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी या टोळीची पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली होती. मुंबईचा निवासी असलेल्या बद्दोविरोधात कविनागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मांतरणात सामील असलेल्या अब्दुल रहमान याला आधीच तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा