पुणे डीआरडीओ हनीट्रॅप प्रकरण : एटीएस तपास अधिकारी हाजीर हो! | पुढारी

पुणे डीआरडीओ हनीट्रॅप प्रकरण : एटीएस तपास अधिकारी हाजीर हो!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय संरक्षण विभागाची गोपनीय माहिती व कागदपत्रे पाकिस्तानला दिल्याप्रकरणी डीआरडीओचा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर याच्या कोठडीची मुदत संपण्याआधी एटीएस तपास यंत्रणेच्या वतीने केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. एटीएसने पुन्हा अर्ज केला असता न्यायालयीन कोठडी वाढवून देण्यात आली. दरम्यान, कुरुलकरच्या ताब्यातून जप्त केलेला लॅपटॉप व त्यातील डाटा हस्तगत करणे बाकी असल्याचे अर्जात नमूद करण्यात आल्याचे समजते. यावरूनच न्यायालयाने तपास अधिकार्‍यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश जारी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या डॉ. कुरुलकर याने देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण होईल असे कृत्य केले होते. मिसाईल व रॉकेट लाँचरसारखे प्रगत तंत्र पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेस दिल्याचे तपासात पुढे आले होते. सध्या कुरुलकर येरवडा कारागृहात असून, तपासात मदत करीत नसल्याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितल्याचे समजते. कुरुलकरकडून जप्त केलेला लॅपटॉपचा पासवर्ड नसल्याने तो बंगळुरू, गुजरातला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्याचा विनंती अर्ज करण्यात आला होता.

तोच अर्ज सोमवारी (दि. 12) पुन्हा करून त्यात लॅपटॉपचा विषय समोर करून कोठडीत वाढ करण्याची विनंती केली गेली. न्यायालयात फॉरेन्सिक तपासणीच्या संदर्भाने अर्ज दाखल झाला असून त्याच्यावरील म्हणणे मांडण्यासाठी तपास अधिकार्‍यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश बजाविल्याचे सूत्रांनी सांगितले. कुरुलकरकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधील डाटा एटीएस तपास अधिकार्‍यांच्या हाती लागला नाही. याच्या तपासासाठी तो बंगळुरू, गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्याची विनंतीही करण्यात आल्याचे समजते. या लॅपटॉपमध्ये संरक्षणविषयक मोठा डाटा असून, त्यातील किती माहिती पाकिस्तानला पुरवली गेली, हेदेखील तपासणे बाकी असल्याचे तपास यंत्रणेने सांगितल्याचे समजते.

हेही वाचा

Accident : शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर १७ दिवसांत सहा जणांचा अपघाती मृत्यू

हाडे कोरून बनवलेल्या १२ हजार वर्षांपूर्वीच्या बासर्‍या

cyclone biparjoy : बिपरजॉय उद्या धडकणार; गुजरातला ऑरेंज अलर्ट

Back to top button