हाडे कोरून बनवलेल्या १२ हजार वर्षांपूर्वीच्या बासर्‍या | पुढारी

हाडे कोरून बनवलेल्या १२ हजार वर्षांपूर्वीच्या बासर्‍या

तेल अवीव : इस्रायलमधील पुरातत्त्व संशोधकांना एका प्रागैतिहासिक स्थळावरील उत्खननात पक्ष्यांची हाडे कोरून बनवलेल्या तब्बल 12 हजार वर्षांपूर्वीच्या बासर्‍या सापडल्या आहेत. त्यांच्यामधून पक्ष्यांसारखे मंजुळ आवाज निघतात, हे विशेष!

‘इनान-मल्लाहा’ किंवा ‘ऐन मल्लाहा’ असे नाव असलेल्या ठिकाणी हे उत्खनन करण्यात आले. पूर्व भू मध्य सागराच्या परिसरातील लेवंट नावाच्या भागात एकेकाळी शिकारी लोकांचा शेवटचा समुदाय राहत होता. त्यांना ‘नाटूफियान्स’ असे म्हटले जाते. ‘इनान मल्लाह’ हे ठिकाणही याच भागातील आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘सायंटिफिक रिपोटर्स’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. 1950 च्या दशकातच या ठिकाणाचा शोध लावण्यात आला होता. त्यावेळेपासून तिथे वेगवेगळे पुरातत्त्वीय संशोधन करण्यात आले आहे. आता करण्यात आलेल्या उत्खननात पक्ष्यांच्या 1,100 हाडांसमवेतच या बासर्‍याही सापडल्या. त्यापैकी एक पूर्णावस्थेत असून, ती 2.6 इंच लांबीची आहे.

जेरुसलेममधील फ्रेंच रिसर्च सेंटरमधील लॉरेंट डेव्हीन यांनी सांगितले की, हे कदाचित जगातील सर्वात छोटे प्रागैतिहासिक वाद्य असेल. ते वाजवले असता त्यामधून युरेशियन स्पॅरोहॉक्स (अ‍ॅक्सीपिटर निसस) आणि कॉमन केस्ट्रेल्स (फाल्को टिनुनक्युलस) या पक्ष्यांसारखाच वरच्या पटीतील ध्वनी बाहेर पडतो. नाटुफियान्स लोक पक्ष्यांच्या हाडांची काळजीपूर्वक निवड करून अशा बासर्‍या बनवत. ससाण्याच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी ते अशा वाद्यांचा वापर करीत असावेत, असे संशोधकांना वाटते.

डेव्हीन यांनी सांगितले, या बासर्‍यांवरून नाटुफियन्स लोकांच्या ज्ञानाचीही कल्पना येते. संशोधकांनीही अशा बासर्‍यांच्या प्रतिकृती बनवून त्यांच्यामधून कसा आवाज येत असे हे पाहिले. त्यासाठी खास कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. त्यांचे स्पेक्ट्रल अ‍ॅनालिसिसही करण्यात आले. बारा हजार वर्षांपूर्वी नाटुफियन्सनी या बासर्‍यांमधून जो ध्वनी निर्माण केला होता, तो आज ऐकताना आम्ही रोमांचित झालो असेही डेव्हीन यांनी सांगितले. अशा आवाजाचा वापर ते कदाचित शिकार करीत असताना करीत होते. कदाचित पक्ष्यांशी संवाद साधण्यासाठीही त्यांना अशा आवाजाचा उपयोग होत असावा. त्यांच्या संस्कृतीमध्ये पक्ष्यांचे स्थान महत्वाचे होते.

Back to top button