cyclone biparjoy : बिपरजॉय उद्या धडकणार; गुजरातला ऑरेंज अलर्ट | पुढारी

cyclone biparjoy : बिपरजॉय उद्या धडकणार; गुजरातला ऑरेंज अलर्ट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिपरजॉय चक्रीवादळ (cyclone biparjoy) बुधवारी गुजरात व पाकिस्तानच्या सीमेवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. किमान 160 कि.मी. वेगाने हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने गुजरातला ऑरेंज अलर्ट दिला आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळाबाबत माहिती घेतली आणि प्रशासनाला सूचना केल्या.

दरम्यान, या चक्रीवादळामुळे मुंबईत समुद्र खवळला असून, खराब हवामानामुळे विमानसेवा ठप्प झाली आहे. अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ आता वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे. गुजरात आणि पाकिस्तानच्या सीमेवर बुधवारी हे चक्रीवादळ धडकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान खात्याने
गुजरातेत ऑरेंज अलर्ट दिला आहे. सौराष्ट्र, कच्छ भागात या चक्रीवादळाची तीव्रता अधिक राहाणार आहे. गुजरातचे सर्व समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. ज्या भागात वादळ धडकण्याची शक्यता आहे, त्या भागातील लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. एनडीआरएफची पथके व स्थानिक प्रशासनाची मदत व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

बुधवारी रात्री अथवा गुरुवारी सकाळी चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ भागात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातच्या किनार्‍यावर मासेमारीला तसेच किनार्‍यावर फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सध्या 1300 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड आणि मोरवी येथे 15 जून रोजी 125 ते 135 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहतील, वार्‍याचा वेग 150 कि.मी.पर्यंत पोहोचू शकतो, असा अधिकार्‍यांचा अंदाज आहे.

मुंबईत वारे आणि पाउस (cyclone biparjoy)

बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्राजवळून पुढे सरकताना किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून समुद्र खवळला आहे. मुंबईतही समुद्राच्या जोरदार लाटा धडकत असून सोसाट्याचे वारे वाहत आहे. या खराब वातावरणाचा फटका विमानसेवेला बसला असून अनेक विमानांना विलंब होत आहे. आणखी 36 तास अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे.

रावेरमध्ये वादळी पाऊस

जळगाव : रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे प्रशासनातर्फे पंचनामे केले जात असून सुमारे 58 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. रावेर शहर व परिसरातील 27 गावांमधील घरांचे व केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वार्‍यामुळे रावेर शहरात सुमारे 120 घरांचे पत्रे उडाले. घरांवर झाडे, विजेचे खांब पडून नुकसान झाले. केळी बागांचे 56 कोटी 68 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी आणि महसूल विभागाने वर्तविला आहे.

दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

बिपरजॉय चक्रीवादळाने उद्भवणार्‍या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत बैठक घेतली. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधानांचे सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पृथ्वी विज्ञान सचिव एम. रविचंद्रन, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे कमल किशोर आणि हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र सहभागी झाले होते.

Back to top button