पुणे : सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे : चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे : सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे : चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्यांना सुखी, आनंदी व मुख्यत: सुरक्षित करण्यासाठी सरकार अनेक योजना आणत आहे, परंतु माहिती अभावी त्यास प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच केंद्रीय संचार ब्यूरोचे अभिनंदन की, जनतेपर्यंत सरकारच्या योजनांची माहिती पोहोचविण्याची वारीची संधी त्यांनी शोधली, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पुणे येथील केंद्रिय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने आयोजित फिरत्या मल्टिमिडीया वाहन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

वारीत चालणार्‍या लाखोंच्या समुदायाला ही दृश्य स्वरूपातील माहिती चांगली कळेल. योजनांची अंमलबजावणी व माहिती अभावी त्यास मिळणारा अल्प प्रतिसाद यासाठी असे उपक्रम उपयोगी ठरतात. योजनांची लोकांना माहिती व्हावी, त्यासाठी त्यांनी नोंदणी करावी, वारीमध्ये सहभागी झालेली ग्रामीण जनता आपापल्या तहसीलदार, तलाठी यांना योजनांच्या अंमलबजावणीकरिता विचारणा करेल, अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त केंद्र सरकाचे 9 वर्षातील कार्य व प्रमुख योजनांची माहिती देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते पंढरपूर, दोनही मार्गांवर एक-एक वाहन प्रवास करणार आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय (विधानभवन) येथे हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, उपायुक्त वर्षा लढ्ढा, तहसीलदार मनीषा देशपांडे, उपसंचालक निखिल देशमुख, व व्यवस्थापक डॉ. जितेंद्र पानपाटील आदींची उपस्थिती होती. या फिरत्या प्रदर्शनास वारकरी आणि भाविकांनी भेट द्यावी, असे आवाहन केंद्रिय संचार ब्यूरोचे उपसंचालक निखिल देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा

धर्मांतर प्रकरणात शाहनवाजला अलिबागमध्ये बेड्या

Ashadhi Wari 2023 : पालख्यांच्या स्वागतासाठी अवघे पुणे शहर सज्ज

Ashadhi Wari 2023 : आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नाही; पोलिस आयुक्तांचे स्पष्टीकरण

Back to top button