Ashadhi Wari 2023 : पालख्यांच्या स्वागतासाठी अवघे पुणे शहर सज्ज

Ashadhi Wari 2023 : पालख्यांच्या स्वागतासाठी अवघे पुणे शहर सज्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे सोमवारी पुण्यनगरीत आगमन होणार असून, सगळीकडे उत्साहाची लहर असून, कार्यकर्त्यांपासून ते मंदिरातील प्रतिनिधींपर्यंत सगळेजण उत्साहाने कामाला लागले आहेत. मध्यवर्ती पेठांसह ठिकठिकाणी सोहळ्याचा हर्षोल्हास पाहायला मिळत आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारी (दि. 12) आणि मंगळवारी (दि. 13) संस्था-संघटनांकडून वारकर्‍यांसाठी विविध धार्मिक-सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, छत्री वाटप असे सामाजिक उपक्रम होतील.

दोन्ही पालख्यांचे सोमवारी (दि. 12) आगमन होईल आणि मंगळवारी (दि. 13) पुण्यात पालख्यांचा मुक्काम असणार आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही दिवस संस्था-संघटनांकडून वारकर्‍यांसाठी सामाजिक उपक्रम आयोजिले आहेत. त्यासाठी मध्यवर्ती पेठांसह ठिकठिकाणी मंडप उभारले असून, त्याद्वारे वारकर्‍यांना अन्नदानही केले जाणार आहे. सोहळ्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार असून, त्यात भजन-कीर्तन, अभंग गायन, सांगीतिक मैफलींचा समावेश आहे.

स्टारविन्स फाउंडेशन आणि लव्ह, केअर, शेअर फाउंडेशनकडून वारकर्‍यांना मेडिकल कीटचे वाटप करण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या दोन्ही दिवशी वारकर्‍यांना हे कीट वाटण्यात येणार असल्याची माहिती प्रणव तावरे यांनी दिली. साईनाथ मंडळ ट्रस्टकडून मंगळवारी (दि.13) वारकर्‍यांना वारीदरम्यान निवार्‍यासाठी तंबू देण्यात येणार आहेत.

तर त्याच दिवशी सकाळी वारकर्‍यांसाठी नाश्ताची व्यवस्था केली जाणार आहे. पालखी सोहळ्यात आपले योगदान देताना आनंद होत असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांनी सांगितले. 'पांडुरंगाच्या द्वारी, आरोग्याची वारी' या संकल्पनेतून सोहळ्यात मंगळवारी वारकर्‍यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजिले आहे. पोटसुळ्या मारुती मित्रमंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट आणि पोटे फाउंडेशनकडून सकाळी दहा वाजता दारुवाला पूल येथील संत देवजी बाबा मंदिर येथे शिबिर होणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news