

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या भारनियमनापेक्षा अतिरिक्त वेळेत वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी शेतातील उभे पिके जळून चालली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त असून वीज वितरण कंपनीने या प्रश्नात लक्ष घालावे; अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या मोठ्या प्रमाणावर वीज नसल्याचा फटका शेतकर्यांना बसत आहे. शेती पंपासाठी 24 तासातील 8 तास वीजपुरवठा केला जातो. परंतु या आठ तासांमध्ये देखील प्रत्येक अर्ध्या तासात वीजपुरवठा खंडित होतो. एकंदरीत दिवसभराच्या आठ तासातील दोन ते तीन तासदेखील वीजपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे शेतकर्यांना शेती पिकांना पाणी देता येत नाही.
वीज आल्यानंतर मोटर चालू होऊन नदीवरून शेतात पाणी येण्यासाठी अर्धा तास लागतो.
एक सारा पूर्ण होईपर्यंतच पुन्हा वीज जाते. त्यामुळे एकाच वाफ्यावर एक दिवस पाणी जात असल्याचे अनेक शेतकर्यांनी सांगितले. याविषयी वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे शेतकरी वर्ग आणखीच वैतागला आहे. जून महिना सुरू झाला तरीही अजून पावसाने दडी मारली आहे व ऊनसुद्धा मोठ्या प्रमाणावर पडत आहे, त्यामुळे शेतातील उभी पिके जळून चालली आहेत. यामुळे वीज कमी द्या, पण सलग द्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
यावर्षी घोड नदीवरील हुतात्मा बाबू गेनू जलाशयात (डिंभे धरण) चांगला पाणीसाठा झाल्याने शेतकर्यांना वर्षभर पाटाद्वारे व नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. सध्याही शेतकर्यांच्या विहिरीत नदीप्रमाणे पाणी आहे; परंतु वीज नसल्याने हे पाणी शेती पिकास द्यायचे कसे, हा मोठा प्रश्न शेतकर्यांकडे उभा राहिला आहे.
सध्या पिकांना बाजारभाव कमी असल्याने शेतकरीवर्ग आर्थकि अडचणीत सापडला असून, 15 जूननंतर बाजारभाव वाढतील या आशेने शेतकर्यांनी अनेक पिके उभी केली आहेत; परंतु ही उभी पिके जळून चालल्याने शेतकर्यांपुढे मोठा प्रश्न उभा आहे. महावितरण कंपनीने सलग वीजपुरवठा करावा; अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल.
– देवदत्त निकम, माजी अध्यक्ष, भीमाशंकर साखर कारखाना
हेही वाचा