’मिनी ऑलिम्पिक’चे प्रमाणपत्र मिळेल का ? शेकडो खेळाडू प्रतीक्षेत

’मिनी ऑलिम्पिक’चे प्रमाणपत्र मिळेल का ? शेकडो खेळाडू प्रतीक्षेत
सुनील जगताप
पुणे : राज्यातील खेळाडू आणि खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच मिनी ऑलिम्पिक स्पर्धा जानेवारीमध्ये भरविण्यात आली होती. या स्पर्धेतील पदक विजेत्यांना अद्यापही प्रमाणपत्रे मिळालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, क्रीडा विभागाच्या वतीने प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा दावा वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला आहे.
राज्यात महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 39 खेळांचा समावेश होता. पुणे, बारामतीसह नागपूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अमरावती, आणि मुंबई येथे स्पर्धा पार पडल्या. या राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये 1 लाख 4 हजार 56 खेळाडू, पंच, मार्गदर्शक, तांत्रिक अधिकारी, स्वयंसेवक आणि अधिकारी यांचा समावेश होता.
39 खेळांमध्ये तब्बल 1,075 सुवर्णपदके, 1 हजार रौप्य आणि 1,450 कांस्य पदकांची खेळाडूंनी लयलूट केली.  मात्र, या स्पर्धेतील खेळाडूंना प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे समोर आले असून खेळाडू पहिल्या मिनी ऑलिम्पिकच्या प्रमाणपत्राच्या प्रतिक्षेत असल्याचे समोर आले आहे.
यावर्षी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पुढाकाराने आणि क्रीडा विभागाच्या सहकार्याने प्रथमच मिनी ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेतील खेळाडूंना प्रमाणपत्र देण्याबाबत क्रीडा विभागाशी यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र, अद्यापही प्रमाणपत्रे मिळाली नसतील तर पुन्हा एकदा क्रीडा विभागाशी संवाद साधू.
– नामदेव शिरगावकर, 
सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन
राज्यात प्रथमच मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन झालेले आहे. या स्पर्धेतील प्रत्येक विजेत्या खेळाडूला स्पर्धेच्या ठिकाणीच प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आलेले आहे. त्यातूनही काही खेळाडूंचे प्रमाणपत्र राहिले असेल तर त्यांनी क्रीडा विभागाशी संपर्क साधावा. त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देऊ.
– सुहास दिवसे, 
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news