ऑनलाईन गेमच्या नादात आईच्या खात्यातील ५२ लाख रुपये साफ | पुढारी

ऑनलाईन गेमच्या नादात आईच्या खात्यातील ५२ लाख रुपये साफ

बीजिंग : ऑनलाईन गेमचे व्यसन लागलेल्या १३ वर्षीय मुलीने चार महिन्यांच्या कालावधीत आईच्या खात्यातील ५२ लाख रु. खर्च केल्याने आईच्या खात्यात अवघे ५१ रु. उरल्याचा धक्कादायक प्रकार चीनमध्ये घडला.

चिनी माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार ही १३ वर्षांची शाळकरी मुलगी शाळेतही मोबाईलचा वापर करत असल्याने व कायम मोबाईलमध्ये असल्याने शिक्षकांनी पालकांना याची जाणीव करून दिल्यावर तिच्या आईला शंका आली. त्यानंतर तिने आपले बँक खाते तपासले असता त्यातून ४ लाख ४९ हजार ५०० युआन म्हणजेच तब्बल ५२ लाख रु. खर्च करण्यात आल्याचे समोर आले. खात्यात अवघे ५१ रुपये उरले होते. वाँग या महिलेने पतीच्या कानावर हा प्रकार घातला. त्याने मुलीला दरडावून विचारताच तिने आपण ऑनलाईन गेमच्या मेंबरशिपसाठी १३ लाख ९३ हजार रु. तर गेममधील अधिक वेपन्स घेण्यासाठी २४ लाख ३९ हजार रु. खर्च केल्याचे कबूल केले. याशिवाय वर्गमित्रांना गेम खरेदी करण्यात मदत म्हणून ११ लाख ६१ हजार रु. खर्च केल्याचेही तिने कबूल केले.

Back to top button