व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल; पारंपरिक शिक्षणाला फाटा | पुढारी

व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल; पारंपरिक शिक्षणाला फाटा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यामुळे पुढील उच्च शिक्षणाची प्रवेश सुरु झाले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांकडून पारंपरिक शिक्षणाला फाटा देत नोकरी देणार्‍या शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्याक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्याद़ृष्टीने विद्यार्थी व पालक ‘पुढारी एज्यु दिशा’ या शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देवून माहिती घेत आहेत. दरम्यान, प्रवेशासाठी सीईटी निकालाची प्रतीक्षा असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व अकृषी विद्यापीठात नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम या वर्षापासून सर्व विद्यापीठात सुरु होणार आहे. त्यामुळे हे नवीन शैक्षणिक धोरण कसे असेल याबाबत कुठे उत्सुकता तर कुठे संभ्रमही आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पदवी प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. पारंपरिक शिक्षणाचे प्रवेश सुरु झाले आहेत.

पारंपरिक शिक्षणात पदवी घेवूनही नोकरीची शाश्वती कमी असल्याने इंजिनिअरिंग, वैद्यकीय, औषध निर्मितीशास्त्र, कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जात आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उद्योजकता विकास आणि नोकरीसाठी आवश्यक असणार्‍या कौशल्य निर्मितीवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु, हे प्रवेश सीईटी परीक्षेवर आधारित होत असल्याने विद्यार्थ्यांना आता सीईटी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

महाविद्यालये व अभ्यासक्रमासाठी भिरकीट

व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालयांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. करिअरसाठी अभ्यासक्रम निवडताना पालक व विद्यार्थ्यांकडून कॉलेज कॅम्पस, सोयी सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व नोकरीच्या संधी याची खातरजमा करण्यासाठी भिरकीट सुरु आहे.

तुलनेने कमी प्रवेश शुल्कामध्ये बीबीए, बीसीए या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. सर्वोकृष्ट शिक्षण, परिपूर्ण मार्गदर्शन व नोकरीची हमी असल्याने प्रवेशासाठी गर्दी होत आहे.
डॉ.बी. एस. सावंत, संचालक, केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च.

Back to top button