टाकळी हाजी : डाळिंब शेतकर्‍यांसाठी या हंगामाचा शेवटही होतोय गोड | पुढारी

टाकळी हाजी : डाळिंब शेतकर्‍यांसाठी या हंगामाचा शेवटही होतोय गोड

टाकळी हाजी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी भागात डाळिंबशेती मोठ्या प्रमाणात असून, येथील बागांची या हंगामातील शेवटची फळतोडणी सुरू आहे. तर बाजारभावात वाढ होत असल्याने टाकळी हाजी, माळवाडी या गावांमध्ये जागेवर डाळिंब खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांची रेलचेल वाढली आहे. महिनाभरापासून फळतोडणी सुरू आहे. अजूनही काही ठिकाणी थोड्या प्रमाणात बागा शिल्लक राहिलेल्या आहेत.

त्यामुळे त्या बागांचे व्यवहार करण्यासाठी व्यापारी स्पर्धा करीत आहेत. बांगलादेश, हैदराबाद, चेन्नई, केरळ, संगमनेर, सांगोला या भागांतील अनेक व्यापार्‍यांनी टाकळी हाजी, माळवाडी, निघोज या ठिकाणी ठाण मांडले आहे. शिल्लक बागांच्या व्यवहारासाठी ते कसरत करीत आहेत. समाधानकारक बाजारभाव मिळाल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांमध्ये देखील चैतन्य पसरलेले आहे. डाळिंब तोडणी केल्यानंतर लगेच ऑनलाइन पेमेंट केले जात असल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल दररोज होत आहे.

थोड्या फार बागा शिल्लक आहेत. बाजारभाव तेजीत असल्याने डाळिंब शेतकर्‍यांसाठी या हंगामाचा शेवटही गोड होणार आहे.

– नारायण कांदळकर, डाळिंब उत्पादक शेतकरी

शेतमालाचे भाव पडल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांना डाळिंबशेतीने मोठा आधार दिला आहे. भविष्यात तरुणवर्गाने पाणी मुबलक असताना पारंपरिक पिके घेण्यापेक्षा हमखास उत्पादन देणार्‍या फळबागांची लागवड करावी.

– कैलास गावडे, कृषी मार्गदर्शक

हेही वाचा

नगर : सैनिक बँकेच्या उपविधी दुरुस्तीस स्थगिती ; सहकारमंत्र्यांचा निर्णय

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा लोणी काळभोर गावातच मुक्काम

वाल्हे पालखीतळाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडून पाहणी

Back to top button