

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येथील विद्या सहकारी बँकेने शुक्रवारी (दि. 9) सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर बँक सेवकांच्या वेतनात 8 टक्के, तर गुणवत्ता अनुदानाच्या स्वरूपात 2 टक्के, अशी एकूण 10 टक्क्यांइतकी भरघोस अंतरिम वाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभदा मानकर यांनी कळविली आहे.
विद्या सहकारी बँकेची सुरुवात बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राध्यापकांच्या पुढाकाराने 9 जून 1974 रोजी झाली. पहिल्या वर्षात 855 सभासदांच्या 50 हजार रुपयांच्या ठेवी, 3 हजार रुपयांचे कर्जवाटप व 1 लाख 34 हजार रुपयांचे खेळते भांडवले होते. आज 31 मार्च 2023 अखेर 425 कोटी रुपयांच्या ठेवी, 222 कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि 484 कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलाचा टप्पा बँकेने गाठला आहे. बाजीराव रोड येथील मुख्य कार्यालयासह बँकेचे पुणे जिल्ह्यात 13 शाखा कार्यरत आहेत.
सेवकांच्या वेतनवाढीच्या निर्णयावर बँक कर्मचारी संघाचे प्रतिनिधी सुनील देसाई व राजेंद्र पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे. बँकेने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदोबस्तावरील पोलिस व इतर कर्मचार्यांसाठी अहोरात पोलिस श्रमपरिहार केंद्र चालविणे, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्या व्यास पुरस्कार देणे, शिक्षणासाठी परदेशी जाणार्या विद्यार्थ्यांना मदत करणे आदी उपक्रम राबवीत सामाजिक बांधिलकी जपणारी बँक अशी ओळख निर्माण करण्यात यश मिळविले आहे.
हेही वाचा