धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळ्यातील साक्रीरोड लगतच्या वसाहतीमध्ये मूर्तीची विटंबना झाल्यानंतर संतप्त झालेल्या हिंदू संघटनांच्या वतीने आज 10 जून रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने मंदिरातील नवीन मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांनी कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.
धुळ्यात मूर्तीची विटंबना झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रशासनाने या संदर्भात तीन संशयतांना अटक केली आहे. या विटंबनेच्या घटनेचा हिंदुत्ववादी संघटना सह राष्ट्रवादी काँग्रेस, मराठा क्रांती मोर्चा, तसेच अनेक अन्य संघटनांनी निषेध नोंदवला आहे. दरम्यान आज 10 जून रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. चाळीसगाव रोड चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजेला या मोर्चाचे सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान विटंबना झालेल्या मंदिरातील मूर्ती खंडित झाल्यामुळे राजस्थान येथून नवीन मूर्ती मागवण्यात आली आहे. या मूर्तीची देखील मिरवणूक काढण्यात येणार आहे. आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर या मूर्तीचे विशेष पूजन करून साक्री रोडवरून नवीन मूर्ती संबंधित मंदिरात नेली जाणार आहे. यानंतर विधिवत पूजन करून मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
खासदार डॉ. सुभाष भामरेंचे आवाहन
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून निघणार्या मोर्चात सकल हिंदू समाजाच्या जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे. मूर्ती विटंबनेच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांच्याशी आपण चर्चा केली आहे. तसेच संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक यांनी आपणास दिले आहेत, असेही खा.डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
जन आक्रोश मोर्चाचे अनुषंगाने सोशल मिडीयावर काही लोक धुळे बंद, धुळयात मोर्चा आहे. याबाबत व्हिडीओ तयार करुन व्हायरल करीत आहे. त्यातील काही व्हिडीओ हे आक्रमक दिसून येत आहे, ते आपल्या जिल्ह्याचे, आपल्या राज्याचे नाही. जुने इतर व्हिडीओ बनवून मोर्चा संबधाने व्हायरल करीत आहे. असे व्हिडीओ कोणीही फॉरवर्ड करु नये, ज्यामुळे अफवा पसरविली जाणार नाही व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. असे व्हिडीओ कोणी व्हायरल केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल.
धुळ्यात सद्या शांतता आहे अशीच शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावे. कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. सत्यपरिस्थितीची आपण पडताळणी करावी. शनिवारी निघणाऱ्या मिरवणुकीबाबत पोलीस यंत्रणा सक्षम आहे. धुळे शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन सी.आर.पी.सी.१४४ (२) चे मनाई आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तरी नागरीकांनी शांतता पाळावी व अफवावर विश्वास ठेवु नये. असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.
हेही वाचा :