Ashadhi Wari 2023 : पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिकेसह आरोग्यदूत | पुढारी

Ashadhi Wari 2023 : पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिकेसह आरोग्यदूत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाच वर्षांतील वारकर्‍यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यामध्ये 15 ते 20 टक्के वाढ अपेक्षित धरून पुणे विभागात आरोग्य सुविधांचे नियोजन केले आहे. यासाठी 5 ते 6 दिंड्यांसाठी 1 आरोग्यदूत अशा प्रकारे सुमारे 100 आरोग्यदूतांची नेमणूक केली आहे. आरोग्यदूतांना विशेष ओळखपत्र, पोशाख दिला जाणार आहे.

प्रत्येक आरोग्यदूतासोबत 1 पॅरामेडिकल स्टाफ, औषध किट आणि दुचाकी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाणार आहे. बाइक अ‍ॅम्ब्युलन्सवरून पालखी कालावधीत संबंधित दिंडीप्रमुखांशी आरोग्यदूत संपर्कात राहणार आहेत. त्यांच्याशी समन्वय ठेवणे, प्रथमोपचार पुरविणे, औषधोपचार करणे, तातडीच्या वेळी रुग्णालयापर्यंत पोहचविणे अशी जबाबदारी आरोग्यदूत पार पाडतील. पालखी मार्गावर तात्पुरते तंबू, फिरते वैद्यकीय पथक तैनात केले जाणार आहे.

दिंडी मार्गावरील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्री कार्यान्वित केली आहे. यासाठी 160 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. पालखी मार्गावरील गावांमध्ये कोरडा दिवस पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपरिषद व हिवताप कार्यालयामार्फत यात्रेपूर्वी 3 दिवस आणि 1 दिवस आधी धूरफवारणीचे नियोजन केले आहे. तापरुग्ण आणि डासअळी सर्वेक्षण करण्यात येत असून, आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोणत्या आरोग्य सुविधा?

  • प्रत्येक रुग्णालय तसेच तंबूमध्ये हिरकणी कक्ष.
  • शासकीय रुग्णवाहिका सुविधा.
  • भौतिकोपचार आणि योगोपचार सेवा.
  • फिरत्या दवाखान्यांची सोय.
  • साथरोग व्यवस्थापनासाठी सेवा आणि जनजागृती.

हेही वाचाा

औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याचे प्रकरण ; शेवगावात दोन युवकांना अटक

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; महापालिकेचे दवाखाने तीन दिवस मोफत

धुळ्यात आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा

Back to top button