कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदासाठी सात संचालकांचे गुडघ्याला बाशिंग | पुढारी

कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदासाठी सात संचालकांचे गुडघ्याला बाशिंग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या अध्यक्षपदासाठी 16 संचालकांपैकी 16 पैकी तब्बल 7 संचालकांनी अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बैठकीत मुलाखतीदरम्यान ज्येष्ठांसह प्रथमच निवडून आलेल्या नवीन संचालकांचाही समावेश असल्याने पक्ष कोणाला संधी देणार याची उत्सुकता वाढली आहे.

शुक्रवारी (दि. 9) बारामती होस्टेलवर सुमारे दोन तास कात्रज डेअरीच्या संचालकांशी पवार यांनी चर्चा करीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, अतुल बेनके, माजी आमदार रमेश थोरात आदी उपस्थित होते.

कात्रजच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर, बाळासाहेब खिलारी, स्वप्निल ढमढेरे, अरुण चांभारे, कालिदास गोपाळघरे यांनी उघड इच्छा व्यक्त केली. या शिवाय सध्या भाजपवासी असलेले मावळ तालुक्यातील संचालक बाळासाहेब नेवाळे आणि विद्यमान उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांनी चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात इच्छुक असल्याचे सांगितल्याने ज्येष्ठ संचालक आणि नवीन संचालकांमधील स्पर्धेत अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे दूध संस्था आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कात्रज दूध संघाची एकूण आर्थिक परिस्थिती, होणारी उलाढाल, दूध संकलन आणि विक्री व्यवस्था या विषयावर अजित पवार यांनी चर्चा करीत एखाद्या तालुका संघापेक्षाही कात्रज संघाचे दूध संकलन कमी असल्याबद्दल संचालकांना विचारणा केल्याचे सांगण्यात आले. कात्रजच्या अध्यक्षपदासाठी 12 जून रोजी निवडणूक होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अध्यक्षपदासाठीचे नाव त्याच दिवशी सकाळी जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

इच्छुकांपेक्षा वेगळा निर्णय?

कात्रज दूध संघाची वार्षिक उलाढाल सुमारे 300 कोटींहून अधिक आहे. संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असून, संघाचे दूध संकलन दोन लाख लिटरहून दीड लाख लिटरपर्यंत घसरले आहे. संघाची आर्थिक स्थिती अडचणीची होऊन तोटा वाढू नये यावर पक्षपातळीवरही विचार केला जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडसारखी मोठी बाजारपेठ हाती असूनही कात्रजची उलाढाल वाढत नाही.

त्यामुळे दूध उत्पादकांचे अधिकाधिक आर्थिक हित साधणे आणि सर्वांना बरोबर घेऊन संघाचा आर्थिक डोलारा सांभाळणार्‍या एखाद्या अनुभवी संचालकांचाही वेगळा विचार अध्यक्षपदासाठी पक्षपातळीवर होण्याची चर्चा वाढली आहे, त्यामुळे कदाचित इच्छुक नसलेल्या अनुभवी संचालकासही संधी देण्यावर पक्षश्रेष्ठी विचार करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

हेही वाचा

ओतूर : गांजा वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात ! तब्बल साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : लाचखोरीमुळे अटक झालेला रामोड हा पहिला आयएएस

पुणे : विद्यापीठाच्या परीक्षांचे पालखीमुळे फेरनियोजन

Back to top button