राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पडताळणी करूनच आता संचमान्यता! | पुढारी

राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पडताळणी करूनच आता संचमान्यता!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर आधारित संचमान्यता प्रक्रियेतील अडचणींमुळे शाळांमध्ये अधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष पडताळणी करून संचमान्यता करण्यात येणार आहे. किमान 90 टक्के विद्यार्थी आधार वैध केलेल्याच शाळांची उर्वरित विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

राज्यात एकूण 1 लाख 4 हजार 878 शाळा आहेत. त्यातील 65 हजार 320 शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत, तर 39 हजार 558 खासगी शाळा आहेत. दरवर्षी शाळांची शिक्षण विभागाकडून संचमान्यता करण्यात येते. संचमान्यतेमध्ये विद्यार्थी संख्येवर शिक्षक संख्या अवलंबून असते. कोरोना काळात दोन वर्षे संचमान्यतेची प्रक्रिया होऊ शकली नव्हती. मात्र, राज्य शासनाने आधार कार्डवर आधारित संचमान्यता करण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार वैधतेनुसार संचमान्यता प्रक्रिया करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर आता प्रत्यक्ष पडताळणीचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिले. 30 नोव्हेंबर 2022 रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 15 जूनअखेर आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन 2022-23 साठीची संचमान्यता अंतिम करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत 80 टक्के आधार वैध विद्यार्थी विचारात घेऊन संचमान्यता करण्यात आल्या आहेत. शाळांकडून विद्यार्थी आधार वैध करण्याचे काम सुरू आहे.

मात्र, विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे विद्यार्थी अवैध ठरत असतील किंवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसल्यास त्या विद्यार्थ्यांमुळे शाळेतील 2022-23 च्या मंजूर पदांवर विपरीत परिणाम होत असल्यास संबंधित शाळा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्‍याकडे विद्यार्थ्यांच्या नावाच्या यादीसह अर्ज करतील.

या शाळांच्या बाबतीत गटशिक्षणाधिकारी संबंधित विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील त्यांची शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांकडून खात्री करून नियमित विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील, असे स्पष्ट करण्यात आले.

कोणते विद्यार्थी ग्राह्य?

नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांची शाळेतील नोंद आणि विद्यार्थ्यांची शाळेतील प्रत्यक्ष उपस्थितीची, संबंधित विद्यार्थी जवळच्या अन्य शाळेत दाखल नाहीत याची खात्री करून संबंधित विद्यार्थी शाळेच्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जातील.

हेही वाचा

Monsoon Rain : पावसाची प्रतीक्षा संपली!

पुणे : मरावे परि नेत्ररुपी उरावे! नेत्रतज्ज्ञांचे आवाहन

बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाची शक्यता

Back to top button