पुणे : मरावे परि नेत्ररुपी उरावे! नेत्रतज्ज्ञांचे आवाहन | पुढारी

पुणे : मरावे परि नेत्ररुपी उरावे! नेत्रतज्ज्ञांचे आवाहन

पुणे : आपल्या देशातील 5 अंध व्यक्तींपैकी 1 म्हणजे साधारणत: 3 लाख लोक बुबुळाच्या आजाराने ग्रस्त आहेत. यापैकी बहुसंख्य रुग्णांना नेत्ररोपण शस्त्रक्रियेने दृष्टी प्राप्त होऊ शकते. मात्र, त्यासाठी दृष्टिदानाच्या चळवळीला बळकटी मिळण्याची गरज नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डोळ्यांच्या अनुवंशिक आजारांमुळे, जंतुसंसर्गामुळे, अपघातामुळे व डोळ्यांची योग्य निगा न राखल्यामुळे अकाली अंधत्व येऊ शकते. साधारणपणे दर वर्षी 1 लाख डोळ्यांची आवश्यकता भासते. त्या तुलनेत केवळ 26 हजार बुबुळांचे नेत्रदान होते.

यासाठी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प प्रत्येक कुटुंबाने करणे आवश्यक आहे. ससून रुग्णालयात बुबुळाच्या आजाराची माहिती देऊन बुबुळाचे आजार अथवा त्यामुळे येणारे अंधत्व नेत्ररोपणाने बरे करता येते, यासाठी जनजागृती केली जात आहे. अंधजनांना दृष्टीच्या माध्यमातून प्रकाशमय जीवन प्राप्त करून देण्यासाठी फक्त नेत्रदानाची प्रतिज्ञा न करता मृत्यूपश्चात नेत्रदान करणे आवश्यक आहे व नातेवाइकांनीही ते कृतीत आणणे आवश्यक आहे.

दृष्टिदान कोणी करावे?

मरणोत्तर नेत्रदानास वयाची अट नाही. नेत्रदान कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, पंथाच्या व्यक्तीला करता येते. कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात. मोतीबिंदू, काचबिंदूच्या शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांनाही नेत्रदान करता येते. नेत्रदानाची शस्त्रक्रिया केलेले रुग्णही मरणोत्तर नेत्रदान करू शकतात.

एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा अर्ज भरला आणि त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर नातेवाइकांची परवानगी नसल्यास नेत्रदानाबाबत सक्ती करता येत नाही. नेत्र प्रत्यारोपणासाठी लागणारे कौशल्य असणा-या डॉक्टरांची संख्या वाढणे आवश्यक आहे. नेत्रपेढीसाठी लागणा-या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, रेकॉर्ड ठेवणे याबाबत पूर्ण तयारी करण्याची आवश्यकता असते.

– डॉ. आशिष महाजन, नेत्ररोगतज्ज्ञ

हेही वाचा

Pudhari Editorial : कूटनीती भारताची, हतबल पाकिस्तान

Brijbhushan Singh : बृजभूषण यांनी कुस्तीपटूंशी गैरवर्तन केले होते; कुस्ती पंच जगबीर

पुणे : खेळण्यांच्या संगतीने लागते शिक्षणाची गोडी!

Back to top button